ऑक्टोबर महिन्यापासून दहा रूपयांनी महाग होणार दिल्ली मेट्रोचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 12:58 PM2017-09-26T12:58:10+5:302017-09-26T13:04:01+5:30
गांधी जयंतीनंतर दिल्ली मेट्रोतून प्रवास तुमच्या खिशाला भारी पडणार आहे.
नवी दिल्ली- गांधी जयंतीनंतर दिल्ली मेट्रोतून प्रवास तुमच्या खिशाला भारी पडणार आहे. दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 3 ऑक्टोबरपासून तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या वर्षी मे महिन्यात मेट्रोच्या तिकीट दरात वाढ केली होती. मे महिन्यात केलेली वाढ 10 मेपासून लागू करण्यात आली. आता दुसऱ्या पर्वातील भाडेवाढ ही 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
मेट्रो रेल्वेच्या तिकिटांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. पण त्याचा भार सर्वसामान्य लोकांवर 3 ऑक्टोबरपासून पडेल. 1 ऑक्टोबरला रविवार आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे तीन तारखेपासून मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांना वाढल्याला किंमतीचं तिकीट काढावं लागणार आहे. मेट्रोने प्रवास करतान सुरूवातीच्या पाच किलोमीटर अंतरासाठी ही भाडेवाढ नसेल पण त्याच्या पुढील स्लॅबसाठी दहा रूपये जास्त द्यावे लागणार आहेत.
मे महिन्यात तिकिटाचे दर वाढविल्यानंतर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचं दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आलं. जून 2016 मध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत जास्त होती. मेमध्ये मेट्रोच्या तिकीट दरात वाढ झाल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटल्याचा डीएमआरसीचा अंदाज आहे. मेट्रो तिकिटांचे दर वाढविल्याने प्रवाशांची संख्या घटेल याची चिंता नसल्याचं डीएमआरसीचं म्हणणं आहे. यावर्षी मे महिन्यात मेट्रोच्या तिकीट दरात वाढ झाली होती, त्याआधी 2009 तिकीट किंमतीत वाढ झाली होती. विजेच्या खर्चासह वाढत्या ऑपरेटिंग खर्चामुळे डीएमआरसीकडून तिकीट दरात वाढ केल्याची मागणी केली होती.
स्टाफ, ऊर्जा आणि रिपेयरिंग खर्चासाठी मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करणं गरजेचं असल्याचं डीएमआरसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.