आता मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त १० तासांत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:59 AM2019-06-22T04:59:33+5:302019-06-22T06:48:37+5:30
एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य, साडेसहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास १५ ऐवजी १० तासांत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी पुढील १०० दिवसांतील कृती आराखड्यात या संदर्भातील प्रकल्पांना मान्यता मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्ग एकूण १ हजार ४८३ किमी इतका आहे. यासाठी सध्या १५ तासांचा अवधी लागतो. मात्र हे अंतर १० तासांत पार करता यावे यासाठी एक्स्प्रेस १३० ऐवजी ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी ६ हजार ८०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मार्गातील सिग्नल यंत्रणा आणि इतर आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी या पैशांचा वापर होईल.
यासह नवी दिल्ली ते हावडा एक्स्प्रेस १ हजार ५२५ किमीचे अंतर पार करण्यासाठी १७ तासांऐवजी १५ तासांचा कालावधी लागावा यावरही रेल्वे प्रशासन काम करत आहे. यासाठी ६ हजार ६८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर ४ वर्षांत काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.
देशातील ५० स्थानकांचा पुनर्विकास
देशातील ५० स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. देशातील प्रत्येक मेल, एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. भारतीय रेल्वेमध्ये अनुदानासह किंवा विनाअनुदान तिकीट काढण्याची सोय उपलब्ध असेल. याबाबत रेल्वे प्रशासन जागृती करणार असून मेल, एक्स्प्रेसमध्ये लोको पायलटसाठी अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था केली जाईल.
६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफाय
सध्या देशातील १ हजार ६०३ रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित ४ हजार ८८२ रेल्वे स्थानकांवर वायफाय बसविण्यात येतील. त्यामुळे पुढील १०० दिवसांच्या कृती आराखड्यात ६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफाय असेल.