प्रीमियम रेल्वेतील प्रवास ५० टक्क्यांपर्यंत महागला
By admin | Published: September 9, 2016 04:43 AM2016-09-09T04:43:39+5:302016-09-09T04:43:39+5:30
राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे.
नवी दिल्ली : राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे. सरकारने बुधवारी हा निर्णय घेतला. आता हे भाडे कमी खर्चाच्या विमान प्रवासाएवढे वा त्याहून अधिक झाले आहे.
भाड्याच्या या नव्या रचनेतून केवळ पहिले दहा टक्के बर्थस् हे सध्याच्या भाड्यात उपलब्ध असतील. राहिलेली ९० टक्के तिकिटे ही मूळ भाड्याच्या (बेस फेअर) १० टक्के जास्त किमतीपासून सुरू होऊन एसी-टू टायरसाठी ५० टक्के तर एसी-थ्री टायरसाठी ४० टक्के जास्तीच्या भाड्यावर संपतील. हे दहापासून ते ५० टक्क्यांपर्यंतचे वाढीव भाडे नऊ सप्टेंबरपासून अमलात येईल परंतु त्याआधीच ज्यांनी तिकिटे काढून ठेवलेली (बुक) आहेत त्यांना हे जास्तीचे भाडे भरावे लागणार नाही.
ही भाडेवाढ रचना प्रीमियम क्लास रेल्वेंना लागू आहे.
दुरांतोतील नॉन एसी क्लासेसवरही याचा परिणाम होईल. परंतु
सगळ््या प्रिमियम रेल्वेतील फर्स्ट एसी व एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासेसना यातून वगळण्यात आले आहे. सध्या ४२ राजधानी, ४६ शताब्दी आणि
५४ दुरांतो रेल्वेंची सेवा उपलब्ध
आहे. ही वाढ किमान भाड्यावर झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नव्या रचनेनुसार सर्वसामान्यांना द्यावे लागेल जास्त भाडे
नव्या रचनेनुसार पहिले दहा टक्के बर्थ हे सध्याच्याच दराने मिळतील. नंतरचे दहा टक्के बर्थ दहा टक्के वाढीने त्यांची निम्मी संख्या गाठेपर्यंत विकले जातील. शेवटचे ५० टक्के बर्थ (एसी टू टायर) बेस फेअरचे थेट निम्मे भाडे जास्त आकारून विकले जातील. एसी-थ्री टायरमधील शेवटचे ६० टक्के बर्थ हे बेस फेअरच्या ४० टक्के जास्त आकारून विकले जातील. केटरिंग, रिझर्व्हेशन आणि सुपरफास्ट चार्जेस आणि सेवा कर मात्र सध्याच्याच दराने आकारले जातील. सध्याच्या बुकिंग पद्धतीनुसार प्रिमियम रेल्वेंत बुकिंग (प्रत्यक्ष प्रवासाआधी ९० दिवस) सुरू होताच पहिली ३० ते ४० टक्के तिकिटे काही मिनिटांतच विकली जातात. त्यामुळे साहजिकच जास्त भाडे भरून ते घ्यावे लागेल.
मनमानी भाडेवाढ करून गरिबांना दाबून टाकण्याचा प्रयत्न
1प्रीमियम रेल्वे भाड्यांत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे सगळे विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करण्याच्या व भाडेवाढ मागे घेण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत. काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2काँग्रेसशिवाय डावे पक्ष, जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दलासह इतर पक्षांनीही या भाडेवाढीबद्दल रेल्वेमंत्र्यांवर टीका करून भाडेवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणीही केली आहे. 3काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप केला. जास्त खर्च करण्याची क्षमता असलेल्या प्रवाशांच्या प्रथम श्रेणी आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीला या वाढीतून वगळण्यात आले आहे हे न समजण्यासारखे आहे, असे सांगून मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे भाडेवाढ कशी कशी झाली याची आकडेवारीच त्यांनी सादर केली. 4सण आणि उत्सवांच्या तोंडावर सरकार मनमानी भाडेवाढ करून गरीब आणि मध्यमवर्गाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अन्य विरोधी पक्षांनीही केला आहे.