प्रवासी दिवसाची कुंभमेळ्याशी सांगड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:34 AM2018-09-17T00:34:11+5:302018-09-17T00:34:37+5:30
तारखांमध्ये बदल; नंतर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास नेणार
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या प्रवासी भारतीय दिवसासाठी जगभरातून येणाऱ्या हजारो अनिवासी भारतीयांना (एनआरआय) कुंभमेळ्याचा अनुभव घेता यावा व प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासही हजर राहता यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन दोन आठवडे उशिराने वाराणसीमध्ये करण्यात येणार आहे.
म. गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले त्या ९ जानेवारीच्या दिवसाला जोडून प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००३ पासून सुरू केले. यंदा मात्र हा कार्यक्रम २१ ते २३ जानेवारी असा तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत होईल. दरम्यान जवळच अलाहाबाद येथे अर्धकुंभमेळा असल्याने येणाºया ‘एनआरआय’ना कुंभमेळ्याचाही अनुभव घेता येईल. विरोधी पक्षांना मात्र या कार्यक्रमाच्या तारखा बदलण्यामागेही राजकारण दिसले. डी. राजा यांनी आरोप केला की, निवडणुकीच्या तोंडावर रा. स्व. संघाच्या इशाºयावर मोदी सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबवू पाहत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने तारखांमधील बदल कायमसाठी नसल्याचे स्पष्ट केले.
प्रवासी भारतीयांच्या विनंतीवरूनच तारखांमध्ये बदल केला गेला आहे. त्यामुळे कुंभमेळा व प्रजासत्ताक दिनाला हजेरी ही दोन मुख्य आकर्षणे असतील. अनिवासी भारतीयांनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी व्हावे. -सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री