वाचव रे जगन्नाथा... देशातील सर्वात मोठ्या खजिन्याची किल्ली हरवली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 03:55 PM2018-06-04T15:55:58+5:302018-06-04T15:55:58+5:30
पुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर मंदिराच्या खजिन्याची चावी कथित स्वरूपात गायब झाली आहे.
भुवनेश्वर- पुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर मंदिराच्या खजिन्याची चावी कथित स्वरूपात गायब झाली आहे. यानंतर पुरीचे शंकराचार्य आणि भाजपानं पटनायक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जगन्नाथ मंदिरातल्या रहस्यमयी खजिन्याची चावी गायब झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खजिना असलेल्या आंतरिक कक्षाची चावीही गायब झाली आहे.
ओडिशा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 एप्रिलला 34 वर्षांनंतर एक चौकशी समिती मंदिरात आली होती. तेव्हापासून ही चावी गायब आहे. खजिन्याची चावी श्रीजगन्नाथ मंदिर प्रबंधकाजवळ नाही, तसेच कोषागारालाही या चावीसंदर्भात काहीही माहिती नाही, असंही जगन्नाथ मंदिराच्या प्रबंधन समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्रा म्हणाले आहेत.
आता या चावीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या प्रकारानंतर ओडिशा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच भाजपा सरकारनंही या प्रकारानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.
ओडिशाचे भाजपा प्रवक्ते पीतांबर आचार्य म्हणाले, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जगन्नाथ मंदिरातल्या रहस्यमयी खजिन्याची चावी गायब झाल्याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तसेच याला कोण जबाबदार आहे हेसुद्धा सांगावं. जगन्नाथ मंदिर हे पुरीमध्ये स्थित आहे. हिंदूंच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे. 50 कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न असलेल्या या मंदिराची एकूण मालमत्ता 250 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या मंदिरातील खजिना लुटण्याचा 12व्या शतकापासून आतापर्यंत 18 वेळा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु अद्यापही कोणालाही हा खजिना लुटण्यात यश आलेलं नाही. जगन्नाथ मंदिरात 7 कक्ष असून, यातील मंदिराचे फक्त 3 द्वार भाविकांसाठी कायम खुले असतात.