अट्टल गुन्हेगारांसारखी केजरीवालांना वागणूक; चेहराही पाहू दिला नाही; भगवंत मान यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 05:24 AM2024-04-16T05:24:34+5:302024-04-16T05:25:59+5:30
अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात तिहार तुरुंगात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय अंतरिम दिलासा देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून पुढील सुनावणी २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात ठेवली आहे.
दरम्यान, अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला. अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या पीठासमोर सुनावणीत केजरीवाल यांच्या पदरी निराशाच आली.
ईडीला नोटीस
ऐन निवडणूक काळात सूडबुद्धीने ईडीने अटक केली. लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. त्यावर लवकरात लवकर म्हणजे २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यातच सुनावणी करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट करत न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून २४ एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले.
भेटीत काय झाले?
मान यांनी आज केजरीवाल यांची तिहार तुरुंगात भेट घेतली. केवळ तीस मिनिटे चाललेल्या भेटीत केजरीवाल यांच्याशी काचेपलीकडून फोनवर संवाद साधावा लागला. त्यांचा आपण चेहराही नीट पाहू शकलो नाही, अशी तक्रार मान यांनी केली. एखाद्या अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप मान यांनी केला.