आधी कर्करुग्ण पत्नीवर उपचार; नंतर घटस्फोट अर्जावर विचार
By Admin | Published: December 4, 2015 03:00 AM2015-12-04T03:00:47+5:302015-12-04T08:38:43+5:30
सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी आलेल्या दाम्पत्यापैकी पत्नीला स्तनाचा कर्करोग झाला असून तिला तातडीने शस्त्रक्रिया व केमोथेरपी करून घेण्याची गरज आहे हे लक्षात
नवी दिल्ली : सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी आलेल्या दाम्पत्यापैकी पत्नीला स्तनाचा कर्करोग झाला असून तिला तातडीने शस्त्रक्रिया व केमोथेरपी करून घेण्याची गरज आहे हे लक्षात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने तिच्या उपचारांसाठी पतीने तातडीने पाच लाख रुपये द्यावेत व ती बरी झाल्यावर घटस्फोटावर विचार केला जाईल, असा आदेश दिला आहे.
कर्करोगासारख्या प्राणघातक रोगाने ग्रासलेली पत्नी घटस्फोट घेतला तर उपचारांसाठी पैसे मिळून जीव तरी वाचविता येईल या विचाराने कदाचित सहमतीने घटस्फोट घेण्यास तयार झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी संमती कायद्यानुसार मनापासून दिलेली संमती ठरत नाही, असे नमूद करून न्या. एम. वाय. इक्बाल आणि न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने बुधवारी हा आदेश दिला.
व्ही. अनुराधा समीर आणि व्ही. मोहनदास समीर यांचा एप्रिल २०१० मध्ये प्रेमविवाह झाला. विवाहाच्या वेळी अनुराधा घटस्फोटिता होती तर मोहनदास अविवाहित होते. अनुराधा मुळची हैदराबादची तर मोहनदास मुंबईत नोकरी करणारे. २०१३ मध्ये भांडण झाले व अनुराधा माहेरी निघून गेली. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीस मोहनदास यांनी, अनुराधा छळ करते या मुद्द्यावर, मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला.
हा दावा हैदराबाद येथे वर्ग करावा,यासाठी अनुराधा यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने दोघांनाही काही तडजोड होते का हे पाहण्यासाठी मेडिएशन सेंटरमध्ये पाठविले. तेथे २६ आॅक्टोबर रोजी दोघांमध्ये तडजोड झाली. त्यानुसार मोहनदास यांनी पोटगी म्हणून अनुराधा यांना पोटगीदाखल एकरकमी साडे बारा लाख रुपये द्यायला तयार झाले.
दोघांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात असा अर्ज केला की, आधी केलेला अर्ज सहमतीच्या घटस्फोटासाठी केलेला अर्ज मानावा, मोहनदास यांनी न्यायालयाच्या निबंधकांकडे १२.५० लाख रुपये बँक ड्राफ्टने जमा करावे व सहमतीने घटस्फोटाचा आदेश झाल्यावर ती रक्कम अनुराधा यांना दिली जावी.
दरम्यानच्या काळात अनुराधा यांनी न्यायालयात अर्ज केला व आपल्याला स्तनाचा कर्करोग झाला असल्याचे निदर्शनास आणले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगितले आहे, असे त्यांनी न्यायालयास सांगितले. अशा परिस्थितीत सहमतीच्या घटस्फोटास अनुराधा यांनी दिलेली संमती मनापासून दिल्याचे मानता येत नाही, असे मत व्यक्त करून न्यायालयाने असा आदेश दिला: मोहनदास यांनी अनुराधा यांना उपचारांसाठी पाच लाख रुपये एक आठवड्यांत द्यावे. मोहनदास यांचा मुंबईतील दावा हैदराबादला वर्ग केला जाईल. तेथे सहमतीच्या घटस्फोटासाठी नव्याने अर्ज करावा. त्या अर्जावर हैदराबादच्या न्यायालयाने अनुराधा बऱ्या झाल्यावर किंवा सहा महिन्यांनतर सुनावणी घेऊन कायद्यानुसार निर्णय द्यावा.
(विशेष प्रतिनिधी)
पत्नीची जबाबदारी पतीवरच
न्यायालयाने म्हटले की, अनुराधा यांनी कर्करोग झाल्याने उघड झाल्यानंतर सहमतीने घटस्फोट घेण्यास दिलेली संमती राजीखुशीची संमती म्हणता येत नाही तसेच अनुराधा यांच्या उपचारांसाठी मोहनदास यांनी खर्च करणे हा घटस्फोट व त्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पोटगीचा भाग असू शकत नाही.
पती या नात्याने आजारपणात पत्नीवर उपचार करणे हे एरवीही मोहनदास यांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे आधी त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी व त्यानंतर घटस्फोटावर विचार केला जाऊ शकेल.