काय सांगता? चक्क झाडांना मिळणार पेन्शन, ७५ वर्षांपेक्षा जुन्या झाडांसाठी २५०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 08:03 AM2023-06-22T08:03:15+5:302023-06-22T08:03:39+5:30
या योजनेला ‘प्राणवायू देवता पेन्शन’ असे नाव देण्यात आले आहे.
- बलवंत तक्षक
चंडीगड : हरयाणात ज्येष्ठ नागरिकांच्या धर्तीवर ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांना वार्षिक २५०० रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. पेन्शनच्या या रकमेतही दरवर्षी वाढ करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्राणवायू देवता पेन्शन’ असे नाव देण्यात आले आहे.
लोकांना त्यांच्या शेतात आणि घराजवळ उभ्या असलेल्या ७५ वर्षे जुन्या झाडांना पेन्शन मिळणे शक्य झाले आहे. पर्यावरण मंत्री कंवरपाल गुजर म्हणाले की, ७५ वर्षांवरील झाडे त्यांच्या प्रसारामुळे जास्त ऑक्सिजन देतात, त्यामुळे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.
पेन्शनची रक्कम मालकाच्या खात्यात
पाच वर्षांसाठी सुरू करण्यात आलेल्या या पेन्शन योजनेत आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. पेन्शनची रक्कम थेट झाड मालकाच्या बँक खात्यात जाईल. या योजनेत किती प्रकारची झाडे समाविष्ट करायची याचा निर्णय विभागीय वन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार आहे.