थरच्या वाळवंटात थरार; भारतीय फौजांचे सिंधू दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:11 AM2019-11-16T06:11:06+5:302019-11-16T06:11:14+5:30
हवाई दल, तोफखाना, रणगाडे यांच्याद्वारे पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्बचा वर्षाव...
निनाद देशमुख
पोखरण : हवाई दल, तोफखाना, रणगाडे यांच्याद्वारे पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्बचा वर्षाव... याच वेळी चिलखती वाहनाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत पाकिस्तानच्या प्रत्युत्तरला न जुमानता त्यांच्या चौक्या उद्ध्वस्त होतात.. वाऱ्याच्या वेगाने शत्रूच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराने सिंधू नदी किनारी तिरंगा फडकवत सिंधू सुदर्शन मोहीम फत्ते केली.
थरच्या वाळवंटात सुरू असलेल्या सिंधु सुदर्शन युद्धसरावात भारतीय लष्कराने आधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धकौशक्य दाखवत थेट पाकिस्तान आणि चीनला गर्भित इशारा दिला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या सुदर्शनचक्र कोअरचे ४० हजार जवान यात सहभागी झाले आहेत. आर्मी-नेव्ही आणि हवाईदल यांचा ताळमेळ महत्त्वाचा असतो. जमिनीवरच्या युद्धात आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यावर हवाई दल, तोफखाना यांच्या मदतीने शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त केली जातात.
>काय आहे प्रात्यक्षिकात?
युद्धात लढताना शत्रूची डिफेन्स लाईन तोडण्यासाठी रॉकेट लाँचर, मिसाईल, तोफखाना प्रभावीपणे कसा वापरला जातो, वेगवान हालचाली करून शत्रूला कशा पद्धतीने चकित केले जाते याची प्रात्यक्षिके झाली. काही सेकंदांत ९० किमीपर्यंत मारा करू शकणारे रशियन बनावटीचे रॉकेट लाँचर, ४० ते ५० किमीपर्यंत मारा करू शकणारे भारतीय बनावटीचे पिनाका रॉकेट लाँचर , आणि वेगाने रॉकेट डागणारे ग्रेड रॉकेट लाँचर यासोबतच ७०० पेक्षा अधिक चिलखती वाहने, ३०० तोफा तसेच वर्ज तोफांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.