मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 07:14 AM2024-11-17T07:14:49+5:302024-11-17T07:17:03+5:30

इम्फाळ : मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यात एक महिला, दोन लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर-आसाम राज्यांच्या सीमेवर जिरी, बराक नद्यांच्या ...

Tremendous tension after three dead bodies found in Maniupar's Jiribam; Demonstrations in front of Minister's House | मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

इम्फाळ : मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यात एक महिला, दोन लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर-आसाम राज्यांच्या सीमेवर जिरी, बराक नद्यांच्या संगमाजवळ आढळून आले. बेपत्ता झालेल्या सहापैकी तीन जणांचे हे मृतदेह असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. हत्या झालेल्या या तीन जणांना न्याय मिळावा या मागणीसाठी संतप्त जमावाने शनिवारी दोन मंत्री व तीन आमदारांच्या निवासस्थानांसमोर निदर्शने केली. त्यामुळे जिरिबाममध्ये जमावबंदी लागू करण्यात आली.
 
लम्फेल सनकीथेल भागात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानासमोर जमावाने निदर्शने केली. लॅम्फेल सनकीथेल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी सांगितले की, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेचे आश्वासन सपम रंजन यांनी दिले.

वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

-संतप्त निदर्शकांनी मणिपूरचे ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल. सुसिंद्रो सिंग यांच्या घरासमोरही निदर्शने केली. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद भागात आंदोलकांनी भाजपचे आमदार व मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे जावई आर. के. इमो यांच्या घरासमोर निदर्शने केली.

-दोषींना २४ तासांच्या आत अटक करा अशा घोषणा जमावाने दिल्या. अपक्ष आमदार सपम निशिकांता सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आंदोलक आले होते. मात्र सपम यांची भेट न झाल्याने आंदोलकांनी त्यांच्या मालकीच्या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयासमोरील बांधकामांचीही नासधूस केली.

सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश

गेल्या काही दिवसांतून मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. दोन समुदायांत होणाऱ्या हिंसाचारामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत.
त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांना आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याने सांगितले की, गेल्या सोमवारी सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ११ दहशतवादी ठार झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी एक महिला, दोन मुलांसह सहा जणांचे अपहरण केले होते. 

मृतदेहांची उत्तरीय तपासणी होणार

आढळलेले मृतदेह आसामच्या सिलचर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. स्थितीबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी शुक्रवारी रात्री राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली होती. विविध ठिकाणी निदर्शने सुरू झाल्य़ाने शनिवारी सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली.

Web Title: Tremendous tension after three dead bodies found in Maniupar's Jiribam; Demonstrations in front of Minister's House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.