ज्या मंदिरासमोर भिक्षा मागितली, त्याच मंदिराला दिली 2.5 लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:26 PM2017-11-24T12:26:08+5:302017-11-24T13:00:36+5:30
85 वर्षांच्या आजीबाई ज्या मंदिरासमोर भीक मागतात, त्याच मंदिराला 2.5 लाख रुपयांची मदत केली आहे.
म्हैसुरु- म्हैसुरुमधील प्रसन्न अंजनेय स्वामी मंदिराच्या समोर इतर भिक्षेकऱ्यांप्रमाणे भीक मागणाऱ्या एका बाईंनी या आठवड्यात केवळ कर्नाटकचेच नाही तर संपुर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. एम.व्ही सीतालक्ष्मी या 85 वर्षे वयाच्या आजीबाईंनी चक्क 2.5 लाख रुपयांची देणगी याच मंदिराला दिली आहे. येत्या हनुमान जयंतीच्या उत्सवामध्ये भक्तांना प्रसादवाटप करण्यासाठी हा निधी खर्च केला जावा अशी त्यांनी विनंती केली आहे. त्यांच्या या मदतीनंतर भक्त त्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मंदिराला पुन्हा भेट देऊ लागले आहेत.
या सीतालक्ष्मी आजींनी मंदिराला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गणपती उत्सवाच्या काळातही 30 हजार रुपये मदतरुपाने दान दिले होते. देवळाच्या विश्वस्तांना घेऊन त्या बॅंकेत गेल्या व दोन लाख रुपये त्यांनी जमा केले, असे आजवर अडिच लाख रुपयांच्यावर त्यांनी मंदिराला मदत केली आहे. याबाबत बोलताना त्यांनी, ' मला भक्तांनी जे दिलं आहे ते मी सगळं मंदिराच्या बॅंक खात्यात जमा केलं आहे. माझ्यासाठी देवच सर्व काही आहे. म्हणून जे मंदिर माझी काळजी घेतं त्या देवळालाच मदत करायचं ठरवलं आहे. जर पैसे माझ्याकडे राहिले तर लोक ते चोरतील, म्हणूनच मी पैसे दान करायचे ठरवले आहेत. हे पैसे हनुमान जयंतीला प्रसादासाठी वापरले जावेत अशी माझी इच्छा आहे' असे टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राला सांगितले. कर्नाटकातील विविध माध्यमांनी सीतालक्ष्मी यांच्या मदतीबद्दल माहिती प्रकाशित केल्यावर त्या एकदम प्रसिद्ध झाल्या आहेत.
सीतालक्ष्मी यांचा मंदिरात काम करणारे कर्मचारी आणि विश्वस्त अत्यंत आदर करतात. मंदिरात काम करणारी राजेश्वरी नावाची मुलगी त्यांना अंघोळीसाठी मदत करते. या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एम. बसवराज यांनी सीतालक्ष्मी यांच्या दातृत्त्वाबद्दल बोलताना माध्यमांना सांगितले, " या बाई इतरांपेक्षा फार वेगळ्या आहेत. त्या भक्तांकडे स्वतः कधीही पैसे मागत नाहीत. भक्त जे पैसे देतील ते त्या घेतात. मंदिराला दान देण्याच्या बाबतीत त्या एकदम उदार आहेत. त्यांनी मंदिराला केलेली मदत आम्ही मंदिरात जाहीर केल्यावर लोक त्यांना आणखीच भीक्षा देऊ लागले आहेत. काही लोक तर त्यांना 100 रुपयांचीही मदत करतात. भक्त त्यांचे आशीर्वादही घेतात. त्यांनी केलेल्या मदतीचा वापर आम्ही योग्य पद्धतीने करु आणि सीतालक्ष्मी यांची काळजीही घेऊ''