ट्रेंडिंगमध्ये आहे कौमार्य परत मिळवण्याची शस्त्रक्रिया
By admin | Published: January 11, 2017 11:46 AM2017-01-11T11:46:50+5:302017-01-11T11:46:50+5:30
समाजाची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरु असली तरी आजही काही अरेंज मॅरेजमध्ये स्त्रीची व्हर्जिनीटी एक मुद्दा असतो.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 11 - समाजाची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरु असली तरी आजही काही अरेंज मॅरेजमध्ये स्त्रीची व्हर्जिनीटी एक मुद्दा असतो. वरपक्षाने शंका उपस्थित करण्याआधी स्वत: मुलीच्या पालकांना तिच्या व्हर्जिनीटीची चिंता असते. अनेकदा या मुद्दावरुन विवाह मोडल्याचीही काही प्रकरणे घडली आहेत.
ग्रामीण भाग सोडा हैदराबादसारख्या प्रगत शहरात व्हर्जिनीटी शस्त्रक्रियांचे पेव फुटले आहे. अलीकडे इथल्या बंजारा हिल्स भागात राहणारी एक महिला आपल्या मुलीला प्लास्टिक सर्जनकडे घेऊन गेली होती. मुलीचा फाटलेला योनी पडदा शिवण्याची शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी ही महिला मुलीला प्लास्टिक सर्जनकडे घेऊन गेली होती.
विवाहानंतर मला माझ्या मुलीच्या आयुष्यात कुठल्या अडचणी नको आहेत. लग्नानंतर माझी मुलगी व्हर्जिन नाही असे नव-या मुलाला वाटले तर ? अशी भिती या महिलेने व्यक्त केली. 20 ते 30 वयोगटातील अनेक मुली योनी पडदा शिवण्याच्या 40 मिनिटांच्या शस्त्रक्रियेसाठी आपल्याकडे येतात असे हैदराबादमधील डॉक्टरांनी सांगितले.
व्हर्जिनीटीमुळे वैवाहिक आयुष्याची चांगली सुरुवात होते असे मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे मत असते. सुरुवातीला माझ्याकडे अशी दोन ते तीन प्रकरणे यायची पण आता वर्षाला अशा 50 केसेस येतात असे एका डॉक्टरने सांगितले. लग्नाआधी सेक्स केल्यामुळेच नव्हे तर, नृत्यामुळे किंवा शरीराच्या जास्त हालचालींमुळेही योनी पडदा फाटतो असे डॉक्टरांनी सांगितले.