त्रिवार तलाकवर घटनापीठात सुनावणी
By Admin | Published: February 17, 2017 12:53 AM2017-02-17T00:53:54+5:302017-02-17T00:53:54+5:30
त्रिवार मौखिक तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लीम समाजात धर्मशास्त्राच्या आधारे रूढ असलेल्या प्रथांची
नवी दिल्ली : त्रिवार मौखिक तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लीम समाजात धर्मशास्त्राच्या आधारे रूढ असलेल्या प्रथांची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ करणार आहे.
विविध पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकांच्या रूपाने सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहर, न्या. एन. व्ही. रमणा व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे हे तीन विषय उपस्थित झाले होते. यातील घटनात्मक बाबी तपासून पाहण्यापुरत्या या याचिका घटनापीठापुढे पाठविण्यात येतील, असे या खंडपीठाने गुरुवारी सांगितले. घटनापीठाकडे नेमके कोणते मुद्दे निर्णयार्थ पाठवायचे हे ३० मार्च रोजी ठरविले जाईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने तयार केलेले मुद्द्यांचे टिपण पाहून न्यायाधीश म्हणाले की, हे घटनात्मक मुद्दे असल्याने त्यांच्यावर याहून मोठ्या न्यायपीठाने विचार करणे गरजेचे आहे. एकूणच हे विषय महत्वाचे असल्याने ते (निर्णय न घेताच) बाजूला सारता येणार नाहीत, असेही हे खंडपीठ म्हणाले. संबंधित पक्षकारांच्या वकिलांनी एकत्र बसावे आणि त्यांच्या मते आम्ही आम्ही कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा ते त्यांनी ठरवावे, असे सरन्यायाधीश म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)