चाचण्या घटल्या, बाधितांचे प्रमाण घटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:51 AM2021-05-06T06:51:40+5:302021-05-06T06:51:48+5:30
महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांत देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले आहे. परिणामी बाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र आहे. बाधितांच्या संख्येत घट नोंदवली जात असल्याने देशव्यापी टाळेबंदीचा निर्णय घ्यावा किंवा नाही, या मुद्द्यावरून केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीत चाचण्यांमध्ये सर्वाधिक घट
महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती. दिल्लीतही पाच दिवसांत २७ टक्क्यांनी चाचण्या कमी झाल्या आहेत. उत्तर प्रदेश कोरोनास्थिती उत्तमरित्या हाताळत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच केले होते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर प्रदेशात २२ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली असली तरी चाचण्यांचे प्रमाण १५ टक्क्यांनी घटले असल्याचे निदर्शनास आले आहे.
आकडेवारी नेमकी किती?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत असले तरी त्यामागे चाचण्यांची घटलेली संख्या हे कारण आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर लोकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे चुकीचे अहवालही दिले जात आहेत किंवा ते पॉझिटिव्ह असल्याचे तोंडी सांगितले जात आहे. या अनागोंदीमुळे कोरोनाबाधितांची नेमकी आकडेवारी किती, याबाबत संभ्रम आहे.
देशाचे चित्र
n देशात गेल्या पाच दिवसांत चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले. ३० एप्रिल रोजी देशभरात १९ लाख ५० हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर ४ मे रोजी हेच प्रमाण १५ लाख ४० हजार एवढे होते.
n नेमक्या याच कालावधीत देशातील कोरोनाबाधितांचा आलेख घसरू लागल्याचे आढळले.
n चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णनोंद घटल्याचे वास्तव मात्र विचारात घेतले गेलेले नाही.