रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, 3 वर्षाच्या मुलीचा मृतदेह घेऊन केला 68 KM पर्यंत प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 09:39 AM2022-11-08T09:39:41+5:302022-11-08T09:42:17+5:30
स्थानिकांनी रुग्णालयातील कर्मचारी आणि सरकार यांच्याबद्दल त्यांच्या 'अमानवी कृत्याबद्दल' संताप व्यक्त केला.
खम्मम : तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातून अमानुष घटना समोर आली आहे. एका आदिवासी जोडप्याला त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह मोटारसायकलवरून 68 किमीपर्यंत घेऊन जाण्यास भाग पडले. खम्मम जिल्हा रुग्णालयात एका आदिवासी दाम्पत्याच्या मुलीचा तापामुळे मृत्यू झाला होता. यानंतर मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका भाड्याने घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. तसेच शासकीय रुग्णालयाने सुद्धा त्यांना रुग्णवाहिकाही दिली नाही.
न्यू इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, आदिवासी जोडप्याला त्यांच्या मुलीचा मृतदेह खम्ममपासून 68 किमी अंतरावर असलेल्या एन्कुर मंडलमधील त्यांच्या मूळ गावी कोथामेडेपल्ली येथे घेऊन जावे लागले. मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका घेण्यासही त्यांच्याकडे पैसे नव्हते. यानंतर आदिवासी दाम्पत्याने आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन 68 किमीचा प्रवास मोटारसायकलवरून करण्याचा निर्णय घेतला. आईने आपल्या मुलीचा मृतदेह मांडीवर घेऊन संपूर्ण प्रवास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, वेट्टी मल्ला आणि आदि यांची तीन वर्षांची मुलगी सुक्कीला ताप आला होता. त्यामुळे तिला सुरूवातीला उपचारासाठी एनकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सूचनेनुसार तिला सोमवारी सकाळी खम्मम जिल्हा रुग्णालयात हलवले. जिथे उपचारादरम्यान मुलगी सुक्की हिचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही दयामाया दाखवली नाही आणि मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
रुग्णालयाने मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. त्यानंतर वेट्टी मल्ला हे 100 रुपये घेऊन आपल्या गावी गेले आणि गावकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली. गावातील एका तरुणाने त्यांना मोटारसायकल दिली, ज्यावरून ते आपल्या मुलीचा मृतदेह गावी घेऊन आले. या घटनेनंतर, स्थानिकांनी रुग्णालयातील कर्मचारी आणि सरकार यांच्याबद्दल त्यांच्या 'अमानवी कृत्याबद्दल' संताप व्यक्त केला.