सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:08 AM2024-06-12T11:08:48+5:302024-06-12T11:09:30+5:30

Mohan Charan Majhi : भाजपचे नेते मोहन चरण माझी आता राज्यातील सत्तेची धुरा सांभाळणार आहेत.

Tribal Leader Mohan Charan Majhi Is Odisha’s New CM; You Know About This 4-Time MLA | सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास

सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास

ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते मोहन चरण माझी यांची निवड करण्यात आली आहे. मोहन चरण माझी हे ओडिशाचे १५ वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री असतील. बीजेडीचे नवीन पटनायक यांनी या ओडिशामध्ये दीर्घकाळ राज्य केले आहे. सन २००० ते २०२४ पर्यंत ते सतत राज्याचे मुख्यमंत्री राहिले. मुख्यमंत्री पदावर नवीन पटनायक हे २४ वर्षे ९८ दिवस राहिले. मात्र, यंदाच्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात सत्तेवर असलेल्या बिजू जनता दलाचा विजयरथ रोखून मोठा विजय नोंदवला. 

राज्यातील १४७ जागांपैकी भाजपने ७८ जागा जिंकल्या. भाजपचे नेते मोहन चरण माझी आता राज्यातील सत्तेची धुरा सांभाळणार आहेत. याशिवाय पार्वती परिदा आणि केव्ही सिंग देव यांचीही उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. दरम्यान, सरपंच म्हणून राजकारणाला सुरुवात करणारे मोहन चरण माझी पहिल्यांदाच आमदार झाले, तेव्हा नवीन पटनायक यांनी पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मोहन चरण माझी हे भाजपचे समर्पित कार्यकर्ते मानले जातात. त्यांचा पक्षात काम करण्याचाही चांगला अनुभव आहे. 

आदिवासीबहुल या राज्यात भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी केवळ आदिवासी चेहरा निवडला आहे. ओडिशातील चार कोटींहून अधिक लोकसंख्येपैकी आदिवासींची लोकसंख्या सुमारे एक कोटी मानली जाते. येथील सुमारे ३० ते ३५ जागांवर आदिवासींचे प्राबल्य आहे. ६ जानेवारी १९७२ रोजी जन्मलेल्या मोहन चरण माझी यांच्या पत्नीचे नाव डॉ. प्रियांका मरांडी आहे. मोहन चरण माझी यांना भाजप संघटनेत आमदारासोबत काम करण्याचा चांगला अनुभव आहे. राज्यातील आदिवासी मोर्चात त्यांनी काम केले आहे.

सरपंच ते आमदार
मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास गावापासून सुरू झाला. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा सरपंच झाले. २००० मध्ये भाजपने मोहन चरण माझी यांना क्योंझर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांनी ही जागा जिंकली आणि आमदार बनले. यानंतर २००९ मध्ये भाजपाने पुन्हा मोहन चरण माझी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यावेळी त्यांनी क्योंझर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा त्याच जागेवरून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली होती.

चौथ्यांदा बनले आमदार
२०२४ मधील विधानसभा निवडणूकीत मोहन चरण माझी हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत मोहन चरण माझी यांना एकूण ८७,८१५ मते मिळाली आणि त्यांनी बिजू जनता दलाच्या मीना माळी यांचा ११, ५७७ मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मोहन चरण माझी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण जंगम आणि स्थावर संपत्ती १.९७ कोटी रुपये आहे.

Web Title: Tribal Leader Mohan Charan Majhi Is Odisha’s New CM; You Know About This 4-Time MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.