आदिवासी महिलेने दागिने गहाण ठेवून बांधलं शौचालय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 04:09 PM2017-11-16T16:09:34+5:302017-11-16T16:11:35+5:30
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलं आहे. या महिलेचं नाव अन्नपुर्णा असं आहे. अन्नपुर्णा यांनी फक्त शौचालय बांधलं नाही, तर गावातील इतर कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आव्हानानंतर देशातील अनेक भागांमधून स्वच्छ भारत मोहिमेला पाठिंबा मिळताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलं आहे. या महिलेचं नाव अन्नपुर्णा असं आहे. अन्नपुर्णा यांनी फक्त शौचालय बांधलं नाही, तर गावातील इतर कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देत आहेत. गावाची लोकसंख्या फक्त 630 इतकी आहे. अन्नपुर्णा आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांना चार अपत्य आहेत ज्यामध्ये दोन मुली आणि मुलं आहेत. अन्नपुर्णा यांचा पती मजुरीचं काम करतो.
अन्नपुर्णा यांनी सांगितलं की, 'मला खुल्यावर शौचाला जायला आवडायचं नाही. त्यामुळेच मी तात्काळपणे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला'. अन्नपुर्णा यांनी शौचालय बांधण्यासाठी सरकारी निधीचीही वाट पाहिली नाही आणि आपल्या कुटुंबासाठी दागिने गहाण ठेवून शौचालय बांधकामास सुरुवात केली. अन्नपुर्ण यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील अन्य कुटुंबांनीही घरात शौचालय बांधण्यास सुरुवात केली आहे. याच गावातील 65 वर्षीय कालीबाई यांनी सांगितलं आहे की, मीदेखील माझ्या घरात शौचालय बांधलं आहे, जेणेकरुन आमच्या मुली, सुनेला उघड्यावर जावं लागू नये.
अन्नपुर्णा आणि कालीबाई यांच्यापासून प्रेरित होत गावातील मीराबाई यांनीदेखील अधिका-यांच्या उपस्थितीत शौचालय बांधकामाला सुरुवात केली आहे. आता गावात एक समितीच नेमण्यात आला आहे. ही समिती सकाळी उठून स्वच्छतेचा संदेश देणार आणि गावातील लोकांकडून उघड्यावर शौचालयाला जाणार नसल्याची शपथ घेणार.
शौचालय नाही 'इज्जत घर' म्हणा, केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्र
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांचं नाव बदलून 'इज्जत घर' ठेवलं जाऊ शकतं. प्रत्येक राज्य आपापल्या मातृभाषेप्रमाणे हे नाव ठेऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात वाराणसीत दौ-यात शौचालयाचं नाव 'इज्जत घर' ठेवल्याने कौतुक केलं होतं. यानंतर 16 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून शौचालयांना 'इज्जत घर' म्हणून संबोधलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. अनेक भाषांचा वापर होत असणारी राज्ये 'इज्जत घर'शी समांतर दुसरं नाव ठेवू शकतात, असंही पत्रातून सुचवण्यात आलं आहे.
वाराणसी दौ-यावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा एका शौचालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांनी शौचालयाचं नाव 'इज्जत घर' ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदींनी यावेळी असेही म्हटले होते की, शहंशाहपूरमध्ये शौचालयाची पायाभरणी केली तेथे शौचालयावर इज्जतघर असे नाव देण्यात आले आहे. मला हे फार आवडले. ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जतघर बांधतील.