तिरंगा अन् शिवशक्ती! चंद्रयान ३ लँडिंगसोबत चंद्रयान २ च्या पदचिन्हाच्या जागेचेही नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 08:38 AM2023-08-26T08:38:37+5:302023-08-26T09:35:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भावूक होत, इस्रोच्या प्रमुखांची गळाभेट घेतली आणि तुम्हा सर्वांना सॅल्यूट करायचे आहे, असे म्हटले. यानंतर मोदींनी चंद्रयान ३ मोहिमेची माहिती घेत शास्त्रज्ञांना संबोधित केले. यावेळी मोदींनी चंद्रयान २ आणि ३ चे लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणांना नावे जाहीर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले. इस्रोच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींना चांद्रयान-3 मोहिमेची माहिती देण्यात आली. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधान मोदींना संपूर्ण मिशनची माहिती दिली.
चांद्रयान-३ च्या लँडिंगवेळी मी दक्षिण आफ्रिकेत होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्या यशाकडे होते. मी तुम्हाला नमस्कार करायला आलो आहे. मला तुम्हा सर्वांना बघायचे होते. मी तुम्हा सर्वांना सलाम करू इच्छितो, असे पंतप्रधान मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.
आणखी एक नामकरण प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा चंद्रयान-2 चंद्राजवळ पोहोचले होते. जिथे त्याच्या पावलांचे ठसे पडले होते. त्याला नाव देण्याचे ठरविले होते. परंतू, ती परिस्थिती पाहता आम्ही ठरवलं होतं की चांद्रयान-३ यशस्वीरीत्या जेव्हा पोहोचेल तेव्हाच आम्ही दोन्ही चंद्रयान मोहिमांची नावे देऊ. त्यामुळे ज्या ठिकाणी चांद्रयान-2 ने पाऊल टाकले आहे, त्या जागेला आता तिरंगा पॉइंट म्हटले जाईल, असे मोदी म्हणाले.
चांद्रयान-३ च्या लँडरने अंगदप्रमाणे आपला पाय रोवला आहे. एका बाजूला विक्रमचा विश्वास आहे. दुसऱ्या बाजूला प्रज्ञानचा पराक्रम आहे. लाखो वर्षांमध्ये प्रथमच पृथ्वीवरील मानव चंद्राची दुसरी बाजू पाहत आहे. हे चित्र जगाला दाखवण्याचे काम भारताने केले आहे. तुम्ही सर्व शास्त्रज्ञांनी हे केले आहे. यामुळे चंद्राचे रहस्य उलगडेल, पृथ्वीवरील आव्हाने सोडवण्यातही मदत होईल, असे मोदी म्हणाले.
प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश मिळतेच. आज भारत हा चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करणारा जगातील चौथा देश बनला आहे. भारताचा प्रवास कुठून सुरू झाला हे पाहिल्यावर हे यश आणखी मोठे होते. तिसऱ्या जगात म्हणजेच तिसऱ्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांमध्ये आपली गणना होत होती. तिथून बाहेर पडल्यानंतर आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारताची गणना पहिल्या रांगेत होत आहे. या प्रवासात इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे. तुम्ही मेक इन इंडियाला आज चंद्रावर नेले आहे, अशा शब्दांत मोदी यांनी स्तुती केली.