Golden Temple: गालावर ‘तिरंगा’, महिलेला सुवर्ण मंदिरात नो एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 07:39 AM2023-04-18T07:39:33+5:302023-04-18T07:40:06+5:30
Golden Temple: गालावर ‘तिरंगा’ काढल्यामुळे पंजाबच्या अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एका महिलेला प्रवेश नाकारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद सुरू झाला. ‘हे पंजाब आहे, भारत नाही’ असे धक्कादायक उत्तर मंदिराच्या सेवादाराने दिल्याचेही व्हिडीओत दिसले.
गालावर ‘तिरंगा’ काढल्यामुळे पंजाबच्या अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एका महिलेला प्रवेश नाकारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद सुरू झाला. ‘हे पंजाब आहे, भारत नाही’ असे धक्कादायक उत्तर मंदिराच्या सेवादाराने दिल्याचेही व्हिडीओत दिसले. त्यानंतर, ‘खलिस्तानींनी सुवर्ण मंदिर ताब्यात घेतले’, अशा कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल होताच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) ‘तो राष्ट्रध्वज नव्हता, कर्मचाऱ्याच्या वागण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो’, असे निवेदन जारी केले.
महिला अटारी येथील ध्वज उतरवण्याचा सोहळा पाहिल्यानंतर सुवर्ण मंदिरात आली होती. महिलेसोबतची व्यक्ती मंदिराच्या सेवादाराला, तिला प्रवेश का नाकारला, अशी विचारणा करते. तेव्हा, तिच्या चेहऱ्यावर ध्वज असल्याचे कारण सेवादार सांगतो. तो भारताचा ध्वज आहे, असे सांगितल्यावर ‘हे पंजाब आहे, भारत नाही’ असे उत्तर सेवादाराने दिल्याचे व्हिडीओत दिसले.
यावर, भारताच्या राष्ट्रध्वजाशी साधर्म्य असलेल्या तीन रंगांचा वापर केल्याने संबंधित कर्मचाऱ्याने राष्ट्रध्वजाचा अपमान केला असे होत नाही. तिच्या चेहऱ्यावरील ध्वज राष्ट्रध्वज नव्हता कारण त्यात अशोक चक्र नव्हते. तो राजकीय ध्वज असू शकतो असे स्पष्टीकरण एसजीपीसी सरचिटणीस गुरचरण सिंग गरेवाल यांनी दिले. तसेच, हे शीख धार्मिक स्थळ आहे, प्रत्येक धार्मिक स्थळाचे काही रिवाज असतात, आम्ही सर्वांचे स्वागत करतो..शीख नेहमीच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर होते आणि स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलिदान दिले होते, असेही नमूद केले. व्हायरल व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट्स करत आहेत.