त्र्यंबकेश्वर ध्वजावतरण बातमी चौकट
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM2016-08-12T00:05:38+5:302016-08-12T00:40:32+5:30
नियोजनाचा अभाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्यमंत्री तसेच अमित शाह नियोजित वेळेनुसार थोडे उशिरानेच कार्यक्रमस्थळी पोहोचल्याने कुशावर्त येथील सांगता कार्यक्रमाचा गोंधळ उडाला. प्रमुख पाहुणे व मान्यवर पोहोचताच व्यासपीठासमोरील छायाचित्रकारांसह सर्वच नागरिकांनी उभे राहून भ्रमणध्वनीमध्ये फोटो काढण्यासाठी गर्दी केल्याने त्यांच्या मागील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणानंतर पाचच मिनिटांत अमित शाह यांनी अधिकार्यांचे सत्कारही उकरल्याने पंधरा मिनिटांत कार्यक्रम आटोपला. या मुख्य कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वरवासीयांना दोन तासांपासून वाट पहावी लागली.
स्वागत फलकांचे वराती मागून घोडे
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या समारोपासाठी नाशिकला एक दिवस आधीपासूनच तयारी सुरू झालेली असताना त्र्यंबकेश्वरला मात्र अगदी ध्वजावतरण कार्यक्रम सुरू होण्यास काही मिनिटे बाकी असतानाही कार्यक्रमाची तयारी सुरू होती. कुशावर्तावर भाविकांच्या स्वागताचा फलक सायंकाळी साडेपाच वाजता लागला. तर विद्युत रोषणाई चक्क सहा वाजेनंतर लावण्यात आली. नगरसेवकांना पासेसचे वाटप अगदी शेवटच्या क्षणी करण्यात आले.
खड्डे बुजविण्यास सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे बुजविण्याचे काम अगदी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होते. विशेष म्हणजे हा रस्ता सिंहस्थात तयार झालेला असला तरी वर्षभराच्या आतच या नवीन रस्त्याला खड्डे पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अमित शाह यांनी घेतले दर्शन सिंहस्थाच्या ध्वजावतरण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर ओझरकडे जाताना त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. अमित शाह यांनी सत्कार सोहळ्यात घाई केली तरी देवदर्शन मात्र निवांतपणे घेतल्याचे चित्र होते.