‘तृणमूलला आव्हान देणाऱ्यांचे हात छाटू’
By Admin | Published: June 24, 2015 12:11 AM2015-06-24T00:11:35+5:302015-06-24T00:11:35+5:30
सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्याचे दु:साहस करणाऱ्यांचे हात छाटण्यात येतील आणि डोळे फोडले जातील, अशी धमकी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे
कोलकाता : सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्याचे दु:साहस करणाऱ्यांचे हात छाटण्यात येतील आणि डोळे फोडले जातील, अशी धमकी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दिली आहे. बॅनर्जी यांच्या या धमकीवर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘जे लोक तृणमूलकडे डोळे वटारून पाहतील त्यांचे डोळे फोडून त्यांना रस्त्यावर फेकून देऊ. जर कुणी आमच्यावर हात उगारला तर आम्ही त्यांचे हातच छाटून टाकू. परंतु लोकशाहीत सामान्य माणसाचाच शब्द शेवटचा शब्द असतो, हे तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे,’ असे २७ वर्षीय अभिषेक बॅनर्जी म्हणाले.
२४ परगणा जिल्ह्याच्या बसिरहाट येथे एका सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.
प्रथमच खासदार बनलेले बॅनर्जी यांच्या या वादग्रस्त विधानावर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कमल बेरिवाल यांनी तर बॅनर्जी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
बॅनर्जी यांनी विरोधकांवर हल्ले करण्यासाठी तृणमूल कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, राज्य सचिव सूर्यकांत मिश्रा यांनीही बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. (वृत्तसंस्था)