तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या, संतप्त जमावाने पळणाऱ्या आरोपींना पकडले, एकाला बेदम मारहाण करून ठार केले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 05:03 PM2023-11-13T17:03:43+5:302023-11-13T17:04:25+5:30
West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची हत्या करून पळत असलेल्या आरोपींना संतप्त जमावाने पकडले. तसेच त्यातील एकाला बेदम मारहाण करून ठार मारले.
राजकीय वादविवादांमधून पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्या होत असतात. दरम्यान, बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची हत्या करून पळत असलेल्या आरोपींना संतप्त जमावाने पकडले. तसेच त्यातील एकाला बेदम मारहाण करून ठार मारले. या घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीची जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. या आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाप ही घटना दक्षिण २४ परगणामधील जॉयनगर येथे घडली आहे. काही आरोपींनी घरातून मशिदीकडे जात असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सैफुद्दीन लष्कर यांच्यावर गोळीबार केला, या गोळीबारात सैफुद्दीन लष्कर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळू लागले. या पळणाऱ्या आरोपींना जमावाने पाठलाग करून पकडले. तसेच त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीमध्ये दोन आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी जमावाकडून सोडवून ताब्यात घेतले. या हत्येच्या घटनेमागे सीपीआयएमचा हात असल्याची शक्यता तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच सीपीएमच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ला केला. यादरम्यान सीपीआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरांना आग लावण्यात आली. परिस्थित बिघडत असल्याचं पाहून परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत टीएमसी नेता सैफुद्दीन लष्कर यांची पत्नी पंचायतीची प्रमुख आहे. दरम्यान, सीपीआयएमवर आरोप झाल्यानंतर सीपीआयएमच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यांनी सांगितलं की, प्रत्येक मृत्यू हा दुर्दैवी असतो. आरोपींना पकडून यामागील कटाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. सैफुद्दीन लष्कर यांची हत्या तृणमूल काँग्रेसमधील अंतर्कलहाचा परिणाम असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच यासाठी सीपीआयएमला दोष देण्यात अर्थ नल्याचे सांगितले.