परदेशातून लाेकसभेचा युजर आयडी ‘लाॅगिन’; आता सभागृहातूनच ‘लाॅगआऊट’; खासदारकी गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 06:32 AM2023-12-09T06:32:56+5:302023-12-09T06:33:36+5:30

विरोधकांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारकडून संसदीय समितीचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे असा आरोप सरकारवर होत आहे.

Trinamool Congress MP Mahua Moitra was disqualified by the Lok Sabha | परदेशातून लाेकसभेचा युजर आयडी ‘लाॅगिन’; आता सभागृहातूनच ‘लाॅगआऊट’; खासदारकी गेली

परदेशातून लाेकसभेचा युजर आयडी ‘लाॅगिन’; आता सभागृहातूनच ‘लाॅगआऊट’; खासदारकी गेली

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिकांकडून पैसे घेतल्याबद्दल संसदीय नैतिकता समितीने त्यांना दोषी ठरविल्यानंतर लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द केली. समितीने मोईत्रा यांचे वर्तन अशोभनीय आणि अनैतिक असल्याचा ठपका ठेवला आहे. 

शुक्रवारी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर समितीच्या अहवालावर चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. मोईत्रा यांना बोलू देण्यात आले नाही. त्यावेळी गदारोळातच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने स्वीकारण्यात आला. तत्पूर्वी, आचार समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर यांनी मोईत्रांविरुद्ध भाजप सदस्य निशिकांत दुबे यांनी केलेल्या तक्रारीवर समितीचा पहिला अहवाल सादर केला.

काय आहेत आरोप?
महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या सदस्य पोर्टलचा युजर आयडी आणि पासवर्ड अनधिकृत व्यक्तीसोबत शेअर करून सभागृहाचा अवमान केला; एवढेच नाहीतर, राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात आणली, असा ठपकाही अहवालात ठेवण्यात आला आहे.

बोलण्याची परवानगी द्यावी : विरोधक 
विरोधकांनी त्यांना सभागृहात बोलण्याची परवानगी देण्याची मागणी केली. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी अहवालाचे विश्लेषण करण्यासाठी आणखी वेळ मागितला. तृणमूलचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनीही मोईत्रा यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी विनंती सभापतींना केली. काँग्रेस सदस्य मनीष तिवारी यांनी दावा केला की नैतिकता समितीचा अहवाल मूलभूतरीत्या सदोष आहे, कारण समितीला सदस्याच्या हकालपट्टीची शिफारस करण्याचे अधिकार नाहीत.

समितीसमाेर पुरेसा वेळ मिळाला : भाजप
भाजप सदस्यांनी माेईत्रा यांना उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याचे म्हटले. हीना गावित यांनी सांगितले की, व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना दूरसंचार, जहाज उद्योग, रिअल इस्टेट, पेट्रोलियम आणि पाइपलाइन या पाच क्षेत्रांमध्ये स्वारस्य आहे. मोईत्रा यांनी विचारलेले ५० प्रश्न हिरानंदानी यांच्याशी संबंधित या पाच क्षेत्रांशी संबंधित आहेत. त्यांचे खाते दुबईमधून ४७ वेळा, ब्रिटन, अमेरिका, नेपाळमधून उघडण्यात आल्याचे मोईत्रा यांनी कबूल केले.

हे तर ‘कांगारू कोर्टा’ने शिक्षा देण्यासारखे...
विरोधकांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारकडून संसदीय समितीचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे, आपण अस्तित्वात नसलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी आढळलो आहोत आणि रोख किंवा भेटवस्तू दिल्याचा कोणताही पुरावा नाही. - महुआ मोईत्रा, माजी खासदार

वर्तन अशोभनीय...
जोशी यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, मोईत्रा यांचे संसद सदस्य म्हणून एका व्यावसायिकाकडून भेटवस्तू स्वीकारणे आणि त्याचे हितसंबंध जोपासणे हे त्यांचे वर्तन अशोभनीय आहे. मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्य म्हणून हकालपट्टी केली जाऊ शकते, असा ठराव करावा.

...म्हणून माेईत्रा यांना परवानगी नाकारली
सभापती बिर्ला यांनी भूतकाळातील दाखला देत माेईत्रा यांना बाजू मांडण्याची परवानगी नाकारली. २००५ मध्ये तत्कालीन सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी प्रश्नांसाठी रोख घोटाळ्यात गुंतलेल्या १० लोकसभा सदस्यांना सभागृहात बोलण्यास मनाई केली होती. अहवाल मांडला त्याच दिवशी सदस्यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडल्याचे बिर्ला म्हणाले.

Web Title: Trinamool Congress MP Mahua Moitra was disqualified by the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.