समाजवादी, बसपा, राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर आता ओवेसींच्या रडारवर तृणमूल काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:09 PM2019-11-21T12:09:15+5:302019-11-21T12:10:20+5:30
ओवेसींनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय आहे. ओवेसी यांची भाषणांनी मुस्लीम वर्ग त्यांच्याकडे लगेच आकर्षीत होतो. त्यामुळे ओवेसींच्या एन्ट्रीने ममता दीदींच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.
नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यात निवडून येण्यासाठी नव्हे तर कमकुवत झालेल्या विरोधी पक्षांना आणखी कमकुवत करण्यासाठी आघाडीवर असलेले एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. त्यांच्या बंगालमधील एंट्रीमुळे भाजपचा मार्ग सुकर होणार असून ममता बॅनर्जी यांचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार असंच चित्र आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने तृणमूलला पाडलेले खिंडार, विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे ममता दीदी सावध झाल्या आहेत.
एमआयएमकडून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. एमआयएमकडे प्रामुख्याने मुस्लीम मतदारांचा ओढा पाहायला मिळतो. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मुस्लीम मते आपल्याकडे वळविण्यात ओवेसींना यश आले आहे. परंतु, कोणत्याही राज्यात एमआयएमला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे निवडून आणण्यापेक्षा भाजपविरोधी पक्षांचे उमेदवार पाडण्यातच एमआयएमचा हातखंडा मानला जातो.
एमआयएममुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मोठा फटका बसला होता. तर भाजपने कधी नव्हे ते उत्तर प्रदेशात बहुमत मिळवून सरकार स्थापन केले. एमआयएमने त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात प्राचार केला. महाराष्ट्रात एमआयएमचे केवळ दोन उमेदवार विजयी झाले. परंतु, मुस्लीम मत विभागल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव पत्करावा लागला.
ओवेसींनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय आहे. ओवेसी यांची भाषणांनी मुस्लीम वर्ग त्यांच्याकडे लगेच आकर्षीत होतो. त्यामुळे ओवेसींच्या एन्ट्रीने ममता दीदींच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.