‘तृणमूल’ चे नेते शुभेन्दू अधिकारी यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 03:52 AM2020-11-28T03:52:21+5:302020-11-28T03:52:45+5:30
ममता बॅनर्जींशी तीव्र मतभेद; भाजपकडून पक्षप्रवेशाचे आमंत्रण
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तीव्र मतभेद झालेले ज्येष्ठ मंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शुभेन्दू यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजपने म्हटले.
पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका असून त्याच्या पार्श्वभूमीवर शुभेन्दू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा हा ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसला बसलेला मोठा राजकीय धक्का आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठविला, तसेच राजीनाम्याच्या पत्राची एक प्रत राज्यपालांनाही दिली.
शुभेन्दू अधिकारी हे वाहतूक व जलसंधारण खात्याचे मंत्री होते. मंत्रिपदावरून दूर झाले असले तरी त्यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे की, शुभेन्दू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तृणमूल काँग्रेस तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहण्याचे शुभेन्दू अधिकारी यांनी सोडून दिले होते. ममता यांच्याशी असलेले मतभेद अधिक तीव्र झाल्याने अधिकारी यांनी हे पाऊल उचलले. ममता बॅनर्जी यांचा भाचा व लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसमध्ये मिळणारे महत्त्व शुभेन्दू अधिकारी यांना मान्य नव्हते.
नाराज आमदार भाजपमध्ये जाणार
तृणमूल काँग्रेसचे आमदार मिहीर गोस्वामी हे भाजपचे खासदार निशित प्रामाणिक यांच्याबरोबर नवी दिल्लीत गेले असून, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. गोस्वामी यांनी मागील काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पक्षात २२ वर्षे राहिल्यानंतर अपमान सहन होत नसल्यामुळे पक्षात राहणे कठीण होत आहे, असेही ते फेसबुकवर पोस्टमध्ये म्हणाले होते. त्यांचे मन वळविण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न करण्यात येत होते. पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.