तृणमूल नेत्यांना आसामात रोखले, मारहाणीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:28 AM2018-08-03T05:28:02+5:302018-08-03T05:28:23+5:30
‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’च्या अंतिम मसुद्याच्या प्रसिद्धीनंतर आसाममध्ये उद््भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार-आमदारांच्या आसाम भेटीवरून तृणमूल व भाजपामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली.
नवी दिल्ली : ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’च्या अंतिम मसुद्याच्या प्रसिद्धीनंतर आसाममध्ये उद््भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार-आमदारांच्या आसाम भेटीवरून तृणमूल व भाजपामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली. आमच्या शिष्टमंडळास सिलचर विमानतळावरच अडवून पोलिसांनी धक्काबुक्की, मारहाण केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला.
आसाममध्ये त्यांनी जाण्याचे काही कारणच नाही, असे म्हणून भाजपाने त्यांना तत्काळ हाकलून देण्याची भाषा केली. या खासदार-आमदारांसोबत पोलिसांच्या झालेल्या झटापटीचे चित्रण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले.
तृणमूलचे सहा खासदार व दोन आमदारांचे शिष्टमंडळ दुपारी सिलचर येथे पोहोचले. तेथील नागरिक सम्मेलनात सहभागी होऊन नंतर नागांव व गुवाहाटीलाही जाण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. सुखेंदू शेखर राय, काकोली घोष दस्तीदार, रत्ना डे नाग, नदिमूल हक, अर्पिता घोष व ममताबाला ठाकूर या खासदारांखेरीज प. बंगालचे नगरविकासमंत्री फिरहाद हकीम व आमदार महुआ मोईत्रा शिष्टमंडळात होते. पण सिलचर विमानतळावरच जिल्हा दंडाधिकारी व पोलिसांनी आम्हाला अडविले. एका पोलिसाने माझ्या छातीवर ठोसा मारला. काकोली दस्तीदार, ममताबाला ठाकूर व महुआ मोईत्रा यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली, असा आरोप सुखेदू राय यांनी केला. ते हृदयरुग्ण आहेत.
खा. घोष दस्तीदार म्हणाले की, पोलिसांनी आमचे मोबाइलही हिसकावून घेतले. ममताबाला व महुआ यांच्याप्रमाणे मलाही धक्काबुक्की केली व सुखेंंदू यांना मारहाण केली. आम्हाला बाहेर जाऊ देईपर्यंत आम्ही येथेच बसून राहू, असे खा. राय म्हणाले. खा. दस्तीदार म्हणाले की, विमानतळावर एक मॅजिस्ट्रेटही होता. शिष्टमंडळ सदस्य म्हणाले की, पुढे काय करायचे हे पक्ष नेतृत्वाशी बोलून ठरवू. संसदेतही हक्कभंग आणण्याची तयारी सुरू आहे. हे शिष्टमंडळ आसाममध्ये तणाव निर्माण करण्यासाठी गेल्याने त्यांना रोखणे योग्यच आहे, असे प. बंगाल प्रदेश भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले. त्यांना तेथे जाण्याचे कारणच काय?, असा सवालही त्यांनी केला. भाजपाचे चिटणीस राहुल सिन्हा म्हणाले की, त्यांना आसामधून सक्तीने बाहेर काढायला हवे.