तृणमूल खासदारांची पंतप्रधान कार्यालयाबाहेर निदर्शने
By admin | Published: January 6, 2017 02:22 AM2017-01-06T02:22:47+5:302017-01-06T02:22:47+5:30
तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील नेते सुदीप बंदोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुुरुवारी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाबाहेर निदर्शने केली
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील नेते सुदीप बंदोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुुरुवारी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाबाहेर निदर्शने केली. घोषणा देत हे नेते कडेकोट सुरक्षा असलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर पोहोचले. या ठिकाणी पोलिसांनी त्यांना रोखले. पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांत आणि तालुक्यांतही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बंदोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोर्चे काढले.
पक्षाचे नेते सौगत रॉय आणि डेरेक ओ ब्रायन यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभा सदस्य पक्षाच्या काही समर्थकांसह साउथ ब्लॉकला पोहोचले. याच ठिकाणी पंतप्रधान कार्यालय आहे. या खासदारांनी मोदी विरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर, दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेऊन तेथून दूर नेले. दोन्ही सभागृहात तृणमूलचे एकूण ४५ सदस्य आहेत. या निदर्शनात बहुतांश सदस्य सहभागी झाले होते.
हे खासदार साउथ ब्लॉकच्या प्रवेशद्वारापर्यंत गेले होते, पण त्यांना तिथे रोखण्यात आले. रॉय म्हणाले की, ‘मोदींनी लागू केलेली नोटाबंदी आणि तृणमूलच्या विरोधात करत असलेली कृती याच्या विरुद्ध आम्ही निदर्शने करत आहोत. हे आंदोलन सुरूच राहील.’