पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल 2019 : तृणमूलची आघाडी कायम; भाजपच्याही जागा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:59 AM2019-05-24T04:59:27+5:302019-05-24T05:58:03+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता.

Trinamool's alliance continues; BJP also increased the seats | पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल 2019 : तृणमूलची आघाडी कायम; भाजपच्याही जागा वाढल्या

पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल 2019 : तृणमूलची आघाडी कायम; भाजपच्याही जागा वाढल्या

Next

- समीर परांजपे
यंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद््ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता. तर आपला बालेकिल्ला सुरक्षित राहावा म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात पूर्वीपेक्षा आक्रमक पवित्रा घेतला. या संघर्षाचे प्रतिबिंब निकालात पाहायला मिळत असून, पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा जागांपैकी तृणमूल काँग्रेस २३, भाजप १८ जागांवर तर काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्यांची मक्तेदारी ममता बॅनर्जी यांनी संपुष्टात आणली होती. आक्रमक नेतृत्वशैली असलेल्या ममतांनी दाखविलेल्या विकासाच्या स्वप्नांची बंगाली माणसाला भुरळ पडली. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत राज्याची अपेक्षित प्रगती होत नसल्याने तेथील सामान्य माणसे दुसऱ्या सशक्त पर्यायाच्या शोधात होती. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे नाममात्र अस्तित्व उरले आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजप पुढे सरसावला.
या राज्यात पाय रोवण्यासाठी तृणमूल काँग्रेसशी संघर्ष करणे अपरिहार्य होते. एके काळी एनडीएचा घटक पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस नंतर राजकीय मतभेदांमुळे या आघाडीपासून दूर गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अतिशय नाराज आहेत. पश्चिम बंगालमध्ये शारदा व अन्य चीट फंडांचा काही हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात असल्याचा भाजपचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे आहे. कोलकाताचे तत्कालीन पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकालाच जेरबंद करण्याची अभूतपूर्व कृती ममता बॅनर्जी सरकारने केली. लोकसभा निवडणुकांत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी ममतांनी पुढाकार घेतला होता. ममता बॅनर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात एकमेकांवर वैय क्तिक स्वरूपाची टीका केली. फोनी वादळासंदर्भात बंगालमधील स्थिती जाणून घेण्यासाठी मोदींनी केलेला फोनही ममतांनी घेतला नाही. मोदींची कार्यशैली, त्यांनी न पाळलेली आश्वासने यांच्यावर ममतांनी कोरडे ओढले होते. तर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विकासातील स्पीड ब्रेकर आहेत असा प्रहार मोदी भाषणांतून करत होते.
कोलकातात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोच्या वेळी तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली. या गोष्टींमुळे पश्चिम बंगालमधील वातावरण ढवळून निघाले होते. लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात मुसंडी मारली असून, तृणमूल काँग्रेसला त्याचा काही प्रमाणात फटका बसला आहे. डाव्या पक्षांची मतेही भाजपकडे वळल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या राज्यात २०२१ साली विधानसभा निवडणुका असून त्यात ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.


>निकालाची कारणे
ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पश्चिम बंगालचा विकास विकास होत नसल्याचा भाजपचा प्रचार सामान्य मतदारांना पटू लागला होता.
त्रिपुरानंतर पश्चिम बंगालमधील सत्ता काबीज करणे हे उद्दिष्ट भाजपने मनाशी धरले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसविरोधात भाजपने पद्धतशीरपणे रान पेटविले.
डावे, काँग्रेस हे या राज्यात क्षीण असल्याने तृणमूल व भाजपमध्येच खरी लढत झाली.

Web Title: Trinamool's alliance continues; BJP also increased the seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.