‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 05:50 AM2018-12-31T05:50:01+5:302018-12-31T05:50:23+5:30
‘ट्रिपल तलाक’ विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे, तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : ‘ट्रिपल तलाक’ विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे, तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सत्तारूढ भाजपाने वरिष्ठ सभागृहात व्हिप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत हे विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने २४५, तर विरोधात ११ मते पडली होती.
रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारीच असा दावा केला आहे की, भलेही राज्यसभेत भाजपाकडे पर्याप्त संख्याबळ नसेल; पण सभागृहात या विधेयकाला समर्थन मिळेल. अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी कोचीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. १० विरोधी पक्ष लोकसभेत या विधेयकाविरुद्ध समोर आले होते, असेही ते म्हणाले. तथापि, अण्णाद्रमुकसह जे पक्ष विविध मुद्यांवर सरकारचे समर्थन करीत होते त्यांनीही या विधेयकाला विरोध केल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. विरोधकांनी ट्रिपल तलाकच्या तरतुदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. (वृत्तसंस्था)
...तर कुटुंबे बर्बाद होतील
ट्रिपल तलाक विधेयकाचे जर कायद्यात रूपांतर झाले, तर अनेक कुटुंबे बर्बाद होतील, अशी भीती आॅल इंडिया मुस्लिम वुमेन पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमडब्ल्यूपीएलबी) व्यक्त केली आहे. पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे की, मतैक्यासाठी काही संधी ठेवण्याची गरज होती.
जेव्हा सर्व पर्याय समाप्त होतात तेव्हाच तलाक होतो. लॉ बोर्डाच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर यांनी म्हटले आहे की, नव्या विधेयकात दिलासा मिळण्याऐवजी शिक्षाच होत असेल, तर आम्ही याविरुद्ध आंदोलन करू.