नवऱ्याची मुजोरी, चपाती करपली म्हणून पत्नीला दिला 'ट्रिपल तलाक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 14:58 IST2018-07-10T14:53:39+5:302018-07-10T14:58:13+5:30
मुस्लीम युवकाने चपाती करपल्याचे कारण देत तीनवेळा तलाक बोलून पत्नीला सोडून दिले.

नवऱ्याची मुजोरी, चपाती करपली म्हणून पत्नीला दिला 'ट्रिपल तलाक'
लखनौ - स्वयंपाक करतेवेळी चपाती करपली म्हणून पतीने पत्नीला घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील एका गावात उघडकीस आला आहे. येथील महोबा जिल्ह्याच्या खरेला पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. मुस्लीम युवकाने चपाती करपल्याचे कारण देत तीनवेळा तलाक बोलून पत्नीला सोडून दिले. याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलिसांना देण्यात आले आहेत.
पहरेथा गावातील 24 वर्षीय रजिया आणि निहाल यांचा 4 जुलै 2017 रोजी विवाह झाला होता. मात्र, वर्षभरातच त्यांच्या संसारात दुरावा निर्माण झाला आहे. याप्रकरणी रजियाने पोलिसात तक्रार दाखल करुन पतीवर गंभीर आरोप केले आहेत. निहालने तलाक देण्याच्या 3 दिवसांपूर्वीच जळालेल्या सिगरेटने अंगावर चटके दिले. तर स्वयंपाक करताना चपाती करपली म्हणून मला तलाक दिला, असे रजियाने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत प्रथम स्थानिक पोलिसांकडे रजियाने तक्रार केली. मात्र, तेथील पोलीस अधिकाऱ्याने तिला रागवत तेथून हाकलून दिले. त्यानंतर तिने जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कानावर आपली कैफियत मांडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक पद्धत रद्द केले असून भारतीय न्यायव्यवस्थेत हा प्रकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.