ट्रिपल तलाकची सुनावणी घटनापीठासमोर होणार
By admin | Published: March 31, 2017 04:33 AM2017-03-31T04:33:31+5:302017-03-31T04:33:51+5:30
ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने
नवी दिल्ली : ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी घेतला. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या खंडपीठासमोर ट्रिपल तलाकप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली, तेव्हा त्यांनी हा विषय घटनापीठाकडे सोपविण्याचे जाहीर केले. आता ११ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल.
मुस्लिमांमधील ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रकरणांची घटनापीठाकडे सुनावणी होईल. या वेळी सर्व पक्षकारांची बाजू ऐकण्यात येईल, असे न्या. केहर यांनी स्पष्ट केले. ट्रिपल तलाक म्हणजे पतीने तीनदा
तोंडी तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देणे आहे. या प्रकारात पत्नीला तलाकनंतर अतिशय वाईट जीवन जगावे लागते. त्यामुळे तोंडी ट्रिपल तलाक रद्द करावा, अशी मागणी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
हस्तक्षेप करता येतो का?
वैयक्तिक कायदे हे राज्यघटनेचे उल्लंघन करतात का तसेच वैयक्तिक कायद्यांमध्ये न्यायालयाला वा अन्य कोणाही संस्थेला हस्तक्षेप करता येतो का, यावर यानिमित्ताने घटनापीठापुढे चर्चा होणार आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे म्हणणे
जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची प्रसंगी हत्याही करू शकतो.
अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे, असे या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला याआधीच्या सुनावणीच्या वेळी सांगितले होते. तसेच मुस्लीम वैयक्तिक कायद्याबाबत निर्णय घेण्याच्या न्यायालयाच्या अधिकारांबद्दलच प्रतिकूल मत व्यक्त केले होते.