"ट्रिपल तलाक पीडित महिलांनी हिंदू धर्म स्वीकारा"
By admin | Published: April 14, 2017 12:12 PM2017-04-14T12:12:58+5:302017-04-14T12:18:18+5:30
ट्रिपल तलाक पीडित महिलांना स्वत:साठी न्याय हवा असेल तर त्यांनी हिंदू धर्म स्विकारावा असं आवाहन हिंदू महासभेच्या महासचिव पूजा पांडे यांनी केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 14 - ट्रिपल तलाक पीडित महिलांना स्वत:साठी न्याय हवा असेल तर त्यांनी हिंदू धर्म स्विकारावा असं आवाहन हिंदू महासभेच्या महासचिव पूजा पांडे यांनी केलं आहे. "जर आपलं सरकार, आणि कायदा तुम्हाला न्याय देण्यात असमर्थ ठरत असेल, तर आम्ही तुम्हाला न्याय देऊ", असं पूजा पांडे बोलल्या आहेत. पूजा पांडे यांनी मुस्लिम महिलांसाठी यज्ञ आयोजित केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांनी ट्रिपक तलाकशी लढण्याची प्रतिज्ञा केली. मुस्लिम महिलांच्या प्रती आपली योग्य भावना असल्याचा विश्वास देत पूजा यांनी पीडित महिलांना सन्मान मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
पूजा यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, "मी फक्त पीडित महिलांचं दुसरं लग्न लावून देणार नाही. तर त्यांचं कन्यादानही करेन". पूजा पांडे यांच्या या वक्तव्याचा ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाच्या उत्तर प्रदेशातील अध्यक्ष शीरिन मसरूर यांनी निषेध केला आहे. लग्नासाठी धर्मपरिवर्तन करण्याची गरज नाही असं त्या बोलल्या आहेत. "जर हिंदू महासभेला खरंच मदत करायची असेल तर त्यांनी पीडित महिलांचं म्हणणं ऐकून घ्यावं. त्यांना सल्ला द्या, शिक्षण द्या आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवून स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करा", असंही शीरिन बोलल्या आहेत. ट्रिपल तलाकवर उपाय शोधणं इतकं सोपं नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
सामाजिक कार्यकर्त्या मारिया आलम यांनीदेखील पूजा पांडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "अशा प्रकारचा सल्ला देण्याआधी त्यांनी हुंडा, स्त्री भ्रूण हत्या आणि हिंदू महिलांसोबत होत असलेल्या शारिरीक हिंसाचाराला थांबवण्याचा प्रयत्न करावा. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ट्रिपल तलाक प्रथेविरोधात लढा देत आहोत. न्याय मिळवण्यासाठी आमचा संघर्ष सुरु आहे".
पूजा यांच्या वक्तव्याचा निषेध करत आलम यांनी सांगितलं की, "हुंडा आणि शारिरीक शोषणाच्या पीडित हिंदू महिलांनाही आम्ही आपल्या लढ्यात सामील होण्याचं आव्हान करतो. जर धर्मपरिवर्तन या समस्येचा उपाय असता तर खूप आधी महिलांनी धर्मांतरण सुरु केलं असतं".