लढाऊ विमान ‘सुखोई’तून सोडले आवाजाहून तिप्पट वेगवान ब्राह्मोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:55 AM2017-11-23T04:55:30+5:302017-11-23T04:56:32+5:30
नवी दिल्ली : हवेत भरारी घेणा-या सुखोई ३०एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राम्होस या जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला.
नवी दिल्ली : हवेत भरारी घेणा-या सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राम्होस या जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला. जमीन, हवा आणि पाणी अशा तिन्ही ठिकाणांहून सोडता येऊ शकणारे ब्राह्मोस हे जगातील पहिले क्षेपणास्त्र ठरले असून त्याच्या या त्रिविध मारकशक्तीने देशाच्या युद्धसज्जतेस नवे बळ मिळणार आहे.
ताशी ३,२०० किमीपर्यंतच्या वेगाने भरारी घेऊ शकणारे सुखोई लढाऊ विमान आणि त्यातून सोडले जाणारे आवाजाहून तिप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्र या संयोग अत्यंत भेदक ठरणारा आहे. यामुळे शत्रूप्रदेशात खूप आतपर्यंत पोहोचून लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या क्षमतेमुळे ब्राह्मोस हे आता भारतीय सैन्यदलांकडील ‘जीप सर्जिकल स्ट्राइक’ करू शकणारे क्षेपणास्त्र ठरणार आहे. याआधी या क्षेपणस्त्राच्या जमीन व जहाजावरून मारा करण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. आता ते हवेत भरारी घेणाºया लढाऊ विमानातूनही सोडणे शक्य होणार आहे. परिणामी भूदल, नौदल व हवाईदल या तिन्ही सैन्यदलांच्या शस्त्रभांडारातील ते एक मोलाचे अस्त्र ठरेल.
बुधवारच्या या चाचणीसाठी हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमाने कोठून उड्डाण केले हे जाहीर करण्यात आले नाही. मात्र संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार हवेत इच्छित स्थळी पोहोचल्यावर सुखोई विमानाच्या पंखावर बसविलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र गुरुत्वीय बलाने खाली सोडण्यात आले. लगेच हे क्षेपणास्त्र आपला मार्ग स्वत: शोधत बंगालच्या उपसागरातील इच्छित लक्ष्याच्या दिशेने झेपावले व अल्पावधीतच त्याचे अचूक वेध घेत लक्ष्य उद््ध्वस्त केले.
ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन २.५ टन आहे. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटाना (डीआरडीओ) व रशियाची ‘एनपीएमओ’ कंपनी यांनी संयुक्तपणे स्थापन केलेली कंपनी या क्षेपणास्त्राचे उत्पादन करते. या वर्गातील ते जगातील सर्वातवेगवान क्षेपणास्त्र आहे. ते लढाऊ विमानावर बसवून वाहून नेता यावे यासाठी हिंदुस्तान एयरोनॉटिक्सने (एचएएल) त्यात सुयोग्य बदल केले.
>संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या यशाबद्दल ब्राह्मोस चमूच्या व डीआरडीओच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अभिनंदनाच्या टिष्ट्वटमध्ये त्यांनी लिहिले की, ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा जमीन, हवा व पाणी अशा तिन्ही पातळींवरून मारा करण्याची क्षमता आत्मसात करून भारताने जागतिक विक्रम केला आहे. लष्करी सज्जतेच्या दृष्टीने हा क्षण ऐतिहासिक आहे.
>भारताने रशियाकडून २७२ सुखोई विमाने घेण्याचा १२ अब्ज डॉलरचा करार केला. त्यापैकी २४० सुखोई लढाऊ विमाने हवाई दलात दाखल झाली आहेत.
आणखी अशाच चाचण्या करून त्या निर्धोकपणे यशस्वी झाल्यावर, एकूण ४२ सुखोई लढाऊ विमाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे बसवून सज्ज करण्याची हवाई दलाची योजना आहे.