रेमडेसिविरच्या उत्पादनामध्ये तीनपट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:55 AM2021-05-05T01:55:10+5:302021-05-05T01:55:39+5:30
भारत लवकरच वाढीव मागणीची पूर्ण पूर्तता करू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरातून तसेच परदेशातूनही रेमडेसिविरची मागणी वाढत असून, अल्पावधीतच भारतामधील उत्पादनामध्ये तीनपटीने वाढ झाल्याची माहिती केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली.
भारत लवकरच वाढीव मागणीची पूर्ण पूर्तता करू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. १२ एप्रिल रोजी देशामध्ये रेमडेसिविरच्या ३७ लाख बाटल्यांचे उत्पादन होत होते. त्यामध्ये वाढ होऊन ४ मे रोजी हे उत्पादन १.०५ कोटी बाटल्यांवर पोहोचल्याचे त्यांनी जाहीर केले. याचाच अर्थ अवघ्या तीन आठवड्यांमध्ये या औषधाच्या उत्पादनामध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. १२ एप्रिल रोजी २० प्रकल्पांमध्ये या औषधाचे उत्पादन सुरू होते ते आता ५७ प्रकल्पांमध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे या उत्पादनामध्ये वाढ होणे सहज शक्य झाल्याचे मंडाविया यांनी सांगितले.