...म्हणून तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 06:42 PM2019-07-30T18:42:48+5:302019-07-30T18:44:18+5:30
तिहेरी विधेयकावर इलेक्ट्रॉनिक मतदान नाही
नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर सध्या राज्यसभेत यावर मतदान सुरू आहे. लोकसभेत तीनवेळा मंजूर झालेलं विधेयक राज्यसभेत मंजूर करण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. राज्यसभेत विधेयकावर मतदान घेत असताना इलेक्ट्रॉनिक मतदानाचा आधार घेतला जातो. त्यामुळे विधेयकाच्या बाजूनं आणि विरोधात नेमकी किती मतदान झालं, याची आकडेवारी अवघ्या काही क्षणांमध्ये सर्वांना दिसते. मात्र तिहेरी तलाक विधेयकावरील मतदानावेळी राज्यसभेत इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला नाही.
तिहेरी तलाकवरील विधेयकावरील मतदानात इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर केला जाणार नसल्याचं राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केलं. राज्यसभेतील अनेक सदस्य नवीन आहेत. त्यांची सदनातील आसन व्यवस्था अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान घेण्यात तांत्रिक अडचण असल्याचं नायडूंनी सभागृहाला सांगितलं. त्यामुळे तिहेरी तलाक विधेयकावर मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात आलं.
तिहेरी तलाकची प्रथा राज्यघटनाविरोधी असल्याचे सांगत यासंदर्भात कायदा संमत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानुसार याआधी केंद्राने दोनदा हे विधेयक संसदेत मांडले होते. मात्र राज्यसभेत एनडीएला बहुमत नसल्याने तिथे हे विधेयक संमत होऊ शकले नाही. विशेष म्हणजे म्हणजे राज्यसभेत विधेयकावर मतदान सुरू असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अनुपस्थित होते.