Triple Talaq: या पाच महिलांनी तिहेरी तलाक विरोधात दिला कायदेशीर लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 12:01 PM2017-08-22T12:01:40+5:302017-08-22T12:38:37+5:30
तिहेरी तलाक विरोधातील या लढ्यासाठी अनेक महिलांनी संघर्ष केला आहे.
नवी दिल्ली, दि. 22- आज सकाळपासूनच सर्वांचं लक्ष लागून असलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला असून तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. न्यायालयाने सहा महिन्यांची बंदी घालताना केंद्र सरकारला सहा महिन्यात यासंबंधी कायदा तयार करण्याचा आदेश दिला आहे. जर सहा महिन्यात सरकारने कायदा तयार केला नाही तर ही बंदी पुढे कायम राहिल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं याचाच अर्थ जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यत तिहेरी तलाकवर बंदी असणार आहे. निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश होता.
पण तिहेरी तलाक विरोधातील या लढ्यासाठी अनेक महिलांनी संघर्ष केला आहे. त्यांच्या लढ्याला आज यश आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे उत्तराखंडच्या शायरा बानो यांचं. शायरा बानो यांनी तिहेरी तलाकचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला. त्याशिवाय आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी याही महिलांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला. या महिलांना पतीकडून फोनवरून, स्पीड पोस्टद्वारे आणि स्टॅम्प पेपरवर लिहून तिहेरी तलाक देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा या पाच महिलांच्या लढ्याला आलेलं यश आहे, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
कोण आहेत या पाच महिला
शायरा बानो
मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शायरा बानो यांना लग्नानंतर 15 वर्षांनी त्यांच्या पतीने तिहेरी तलाक दिला. ऑक्टोबर 2015मध्ये शायरा बानो यांना तिहेरी तलाक दिला होता. त्यांना 2 अपत्य आहेत. बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं. मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं. तिहेरी तलाक म्हणजे संविधानातील घटनाक्रम 14 आणि 15 च्या अंतर्गत मिळणाऱ्या मुलभूत अधिकारांचं उल्लघन आहे, असं शायरा बानो यांनी त्यांच्या अर्जात म्हंटलं होत.
आफरीन रहमान
जयपूरच्या 25 वर्षीय आफरीन रहमान हिनेसुद्धा तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आफरीन यांचं एका मेट्रोमोनिअल साइटवरून लग्न जमलं होतं. त्यांनी 2014 मध्ये लग्न केलं.आफरीनच्या पतीने तिला स्पीड पोस्टच्या माध्यमातून तिहेरी तलाक दिला होता. जे अत्यंत चुकीचं होत. आफरीन रहमान हीने कोर्टाकडे तिला न्याय मिळण्याची मागणी केली होती. पती आणि सासरची लोक हुंड्यांची मागणी करतात, त्यासाठी मला मारहाण करून घराच्या बाहेर काढल्याचा आरोप आफरीन रहमान हिने केला होता.
अतिया साबरी
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील अतिया साबरी यांच्या पतीने त्यांना एका कागदावर तीन वेळा तलाक हा शब्द लिहून दिला होता आणि अतियाशी सगळे संबंध तोडले होते. 2012मध्ये अतियाचं लग्न झालं होतं. त्यानंतर 12 डिसेंबर 2015 मध्ये त्यांना पतीने तिहेरी तलाक दिला. अतिया यांना दोन मुली आहेत. दोन मुली झाल्याने नाराज झालेल्या पतीने आणि सासरच्या लोकांनी अतिया यांना घराच्या बाहेर काढलं, असा आरोप त्यांनी केला. तसंच हुंड्यासाठीही त्यांना त्रास दिला जात होता.
गुलशन परवीन
उत्तर प्रदेशाच्या रामपूरमध्ये राहणाऱ्या गुलशन परवीन यांना त्यांच्या पतीने दहा रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर तलाकनामा पाठविला होता. परवीन यांचं 2013मध्ये लग्न झालं होतं तर त्यांना 2015मध्ये पतीने तिहेरी तलाक दिला.त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे.
इशरत जहाँ
तिहेरी तलाक विरोधात कोर्टात जाणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालच्या हावडामधील इशरत जहाँ यांचाही समावेश आहे. इशरत यांच्या पतीने दुबईतून फोनवरून त्यांना तलाक दिला होता. इशरत जहाँ यांना लग्नानंतर पंधरा वर्षांनी पतीने तिहेरी तलाक दिला. त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं, 2001 मध्ये त्यांचं लग्न झालं असून त्यांना मुलं आहेत. त्या मुलांना त्यांच्या पतीने जबरदस्तीने त्यांच्याकडे ठेवलं आहे. आपली मुलं परत मिळावी तसंच पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी इशरत यांनी याचिकेत केली. तिहेरी तलाक बेकायदेशीर असून मुस्लिम महिलांच्या अधिकाराची गळचेपी असल्याचं त्यांनी याचिकेत म्हंटलं होतं.