मुलांनीच जन्मदात्या आईला जीवंत संपवलं; झाडाला बांधून पेटवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 08:58 AM2024-09-30T08:58:44+5:302024-09-30T09:35:41+5:30
त्रिपुरा येथे एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या मुलांनी झाडाला बांधून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Tripura Crime : पश्चिम त्रिपुरातून एक हादरवणारा गुन्हा उघडकीस आला आहे. त्रिपुरा येथे एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी झाडाला बांधून पेटवून दिले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. आरोपी मुलांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून हा गुन्हा घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
त्रिपुरामध्ये मुलांनी आईची निर्घृण हत्या केली. पश्चिम त्रिपुरामध्ये एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या दोन मुलांनी झाडाला बांधून जिवंत जाळले. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री चंपकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबरबारीत घडली. महिलेच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे ही महिला तिच्या दोन मुलांसह राहत होती. तिचा दुसरा मुलगा आगरतळा येथे राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाडाला बांधलेला जळालेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. "आम्ही महिलेच्या दोन मुलांना त्यांच्या कथित गुन्ह्यासाठी अटक केली आहे. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात येणार आहे. तसेच या घटनेमागे कौटुंबिक वाद हे कारण असू शकते," असे जिरानियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कमलकृष्ण कोलोई यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात रविवारी एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याचे वडील आणि भावांसह आठ जणांना अटक केली. ही घटना गेल्या गुरुवारी रात्री पोलिस स्टेशन हद्दीतील खर्गापूर खोरी गावात घडली होती. या गावातील रहिवासी कैलाशनाथ शुक्ला यांनी त्यांचा मुलगा विनोद शुक्ला याला एका कार्यक्रमाच्या बहाण्याने घरी बोलावले होते. त्यावेळी जमिनीच्या वादातून त्यांनी आणि त्याच्या पाच मुलांनी विनोदवर हल्ला करून त्याची हत्या केली. विनोदच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी १४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विनोदच्या मृत्यूची बातमी कळताच कैलास आणि त्याची पाच मुले फरार झाली.