भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 01:05 PM2018-08-06T13:05:22+5:302018-08-06T13:06:41+5:30

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपाचा मुख्यमंत्री वादात

tripura cm biplab kumar deb wikipedia page edited 37 times in 3 days over nrc controversy | भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज

भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज

आगरतळा: मी भारतीय असून माझा जन्म भारतातच झाला आहे, असं त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लल कुमार देव यांनी म्हटलं आहे. विप्लव देव यांच्या जन्मस्थळावरुन सध्या वाद सुरू आहे. देव यांच्या विकिपीडिया पेजवर गेल्या तीन दिवसांमध्ये 37 वेळा बदल झाले आहेत. देव यांचा जन्म बांगलादेशमध्ये झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विकिपीडिया पेजवर सतत बदल केले जात आहेत. 

आसाममध्ये 30 जुलैला नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा (एनआरसी) अंतिम मसुदा लागू करण्यात आला. यामध्ये राज्यातील तब्बल 40 लाख लोकांची नावं नाहीत. त्यामुळे आसाममध्ये नागरिकत्वचा वाद पेटला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून विप्लव देव यांच्या विकिपीडिया पेजवरुनही वादंग माजला आहे. गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांमध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेल्या विप्लव देव यांचं विकिपीडिया पेज तब्बल 37 वेळा एडिट करण्यात आलं आहे. देव यांचं जन्मस्थान त्रिपुरातील गोमती जिल्ह्याऐवजी बांगलादेशच्या चांदपूर जिल्ह्यात असल्याची माहिती विकिपीडिया पेजवर दिली जात आहे. 

विप्लव देव यांच्या विकिपीडिया पेजवर पहिला बदल शनिवारी सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी करण्यात आला. देव यांचं जन्मस्थान चांदपूरच्या कछुआमधील राजधर नगर असल्याचा बदल करण्यात आला. यानंतर दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी त्यांचं जन्मस्थान राजधर नगरऐवजी त्रिपुरातील गोमती जिल्हा असं करण्यात आला. पुन्हा दुपारी 2 वाजून 37 मिनिटांनी त्यांचं जन्मस्थळ बदलून ते बांगलादेश करण्यात आलं. 'अवैधपणे भारतात स्थलांतर केल्यावर त्यांनी त्रिपुरातील शाळेत शिक्षण घेतलं,' अशी माहिती विकिपीडियावर देण्यात आली आहे. यानंतर पुन्हा संध्याकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी पेजवर बदल करण्यात आला आणि देव यांचा उल्लेख बांगलादेशी असा करण्यात आला. यानंतर शुक्रवारी आणि शनिवारीही त्यांच्या पेजवर अनेक बदल करण्यात आले. 
 

Web Title: tripura cm biplab kumar deb wikipedia page edited 37 times in 3 days over nrc controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.