स्वतःचं घरही नसलेले माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आता कुठे राहतात माहित्येय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 03:50 PM2018-03-08T15:50:46+5:302018-03-08T16:04:59+5:30
माणिक सरकार यांनी आपली पिढीजात संपत्ती बहिणींना देऊन टाकली आहे.
आगरतळा- भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री ओळखले जाणारे माणिक सरकार सत्तेतून बाहेर गेल्यावर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये राहत आहेत. आगरतळा येथे पक्षकार्यालयावरती असणाऱ्या दोन खोल्यांच्या सदनिकेत माणिक सरकार आणि त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य राहत आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदावरुन २० वर्षांनी पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे स्वतःचे घर नसल्यामुळे दोघांनाही पक्ष कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला आहे. आमदार निवासस्थानात राहण्यास सरकार यांनी नकार दिला आहे.
माकपाच्या त्रिपुरा विभागाचे सचिव बिजन धर यांनी या कार्यालयामध्ये फारशा सोयी नसल्याचे सांगितले. आमच्या पक्षाच्या नेत्यांचे आयुष्य अत्यंत साधे असल्याचे सांगितले. माणिक सरकार यांनी आपली पिढीजात संपत्ती बहिणींना देऊन टाकली आहे आणि यापूर्वीही ते पक्षाच्या कार्यालयामध्ये राहिलेले आहेत. सरकार यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य यांची त्रिपुरामध्ये स्थावर मालमत्ता होती पण ती एका बांधकाम व्यावसायिकाला दिल्यावर वाद निर्माण झाला होता. या इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सर्व प्रकारच्या सरकारी सोयी मिळतील असे मत मुख्यमंत्री पदाचे दावेदार विप्लव देव यांनी व्यक्त केले असून विरोधी पक्षनेत्यासही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा व भत्ते मिळतील आणि इतर आमदार एमएलए हॉस्टेलमध्ये राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. माणिक सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्या त्रिपुराच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे असेही देव यांनी सांगितले.