त्रिपुरा निवडणूक : विक्रमी मतदान करा, पंतप्रधान मोदींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 08:13 AM2018-02-18T08:13:02+5:302018-02-18T08:14:46+5:30
त्रिपुरात विधानसभेच्या 59 जागांसाठी आज रविवारी मतदान होत आहे. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वात येथे सध्या डाव्यांचे सरकार असून 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षापुढे भाजपाचे आव्हान आहे.
नवी दिल्ली : त्रिपुरात विधानसभेच्या 59 जागांसाठी आज रविवारी मतदान होत आहे. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वात येथे सध्या डाव्यांचे सरकार असून 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षापुढे भाजपाचे आव्हान आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून नागरिकांनी विक्रमी मतदान करावे असं आवाहन केले आहे. त्रिपुरातील माझ्या सर्व नागरिकांनी विशेषतः तरूण मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावं आणि विक्रमी मतदान करावं असं आवाहन मोदींनी केलं आहे.
I appeal to my sisters and brothers of Tripura, particularly young voters, to turnout in record numbers and cast their vote in the Assembly Elections.
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2018
राज्यात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. मात्र, चारीलम विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार रामेंद्र नारायण देब वर्मा यांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे या ठिकाणी आता 12 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यात 20 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात चार सभा घेतल्या. या सभांना भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि स्मृती इराणी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री माणिक सरकार हे पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा ठेवून लढत आहेत. प्रचार मोहिमेचे नेतृत्वही त्यांनीच केले. राज्यात 50 सभा घेऊन त्यांनी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.