Tripura Elections 2023: “भाजप गंगेसारखा! डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका”; मुख्यमंत्र्यांची विरोधकांना खुली ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:00 AM2023-01-10T10:00:47+5:302023-01-10T10:01:21+5:30
Tripura Elections 2023: भाजपच्या गंगेत पवित्र स्नान केले तर तुमची सर्व पापे धुऊन जातील, असे सांगत विरोधकांना थेट पक्षात येण्याची खुली ऑफर देण्यात आली आहे.
Tripura Election 2023: देशात कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या निवडणुका सुरूच असतात. अलीकडेच गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्या. यात गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. तर, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यातच आता त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या एका सभेत भारतीय जनता पक्ष गंगेसारखा आहे. यात डुबकी मारा आणि पापे धुऊन टाका, असे सांगत त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना थेट ऑफर दिल्याची चर्चा आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. साहा यांनी सांगितले की, भाजप गंगा नदीसारखा आहे आणि त्यात डुबकी घेतल्याने सर्व पापांची मुक्तता होईल. जनविश्वास रॅलीचा एक भाग म्हणून दक्षिण त्रिपुरातील काकराबन येथे जाहीर सभेला संबोधित करताना साहा बोलत होते. तसेच या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निश्चित विजय मिळेल, असा विश्वासही साहा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
गंगेत पवित्र स्नान केले तर तुमची सर्व पापे धुऊन जातील
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, जे अजूनही स्टॅलिन आणि लेनिन यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतात त्यांना मी आवाहन करतो. त्यांनी भाजपमध्ये यावे. जर तुम्ही गंगेत पवित्र स्नान केले तर तुमची सर्व पापे धुऊन जातील. तसेच रेल्वेचे डबे अजूनही रिकामेच आहेत. रिकाम्या डब्यात बसा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना त्या स्थानावर घेऊन जातील जिथे आपल्याला असायला हवे, असे साहा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष माकपावर निशाणा साधत साहा यांनी आरोप केला की, कम्युनिस्ट पक्षाने लोकांचे लोकशाही अधिकार दडपले आणि त्रिपुरामध्ये वर्षानुवर्षे राज्य केले. कम्युनिस्ट राजवटीत लोकशाही नव्हती. त्यांचा हिंसाचार आणि दहशतवादी डावपेचांवर विश्वास होता. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यात डाव्यांच्या राजवटीत ६९ विरोधी नेत्यांची हत्या झाली. काकराबानलाही अपवाद नव्हता जिथे अनेक राजकीय हत्या झाल्या, असा आरोप साहा यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"