अधिकाऱ्यांनो, ड्युटीवर असताना जिन्स, गॉगल वापरु नका; राज्य सरकारच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:22 AM2018-08-28T09:22:15+5:302018-08-28T09:24:49+5:30
सरकारच्या आदेशावर काँग्रेसची जोरदार टीका
नवी दिल्ली: त्रिपुरातील सत्ताधारी भाजपासरकारनं अधिकाऱ्यांना कपड्यांबद्दल महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. याबद्दल राज्य सरकारकडून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असताना जिन्स, डेनिम वेअर आणि सनग्लासेस वापरु नयेत, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. सरकारच्या या आदेशावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे.
मुख्य सचिव सुशील कुमार यांनी अधिकाऱ्यांच्या ड्रेस कोडबद्दल एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. राज्यातील अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान ड्रेस कोडचं पालन करावं, अशा सूचना यामधून देण्यात आल्या आहेत. 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सचिव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांनी ड्रेस कोडचं पालन करावं,' असं मुख्य सचिवांनी परिपत्रकात म्हटलं आहे. 20 ऑगस्टला या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपल्याला 30 वर्ष भारत सरकारच्या सेवेचा अनुभव आहे. या कार्यकाळात आपण कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याला कॅज्युअल ड्रेसमध्ये कार्यालयात पाहिलेलं नाही, असंही कुमार यांनी परिपत्रकात म्हटलं आहे. 'काही अधिकारी बैठकीदरम्यान मोबाईलवर मेसेज वाचतात आणि मेसेज पाठवतात. यामुळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीचा अपमान होतो,' असंही परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तापस डे यांनी या आदेशावर जोरदार टीका केली आहे. सरकारचा हा आदेश सामंतशाही मानसिकतेचं प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं.