त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये कोणाचं असणार सरकार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 07:27 AM2018-03-03T07:27:22+5:302018-03-03T07:27:22+5:30
ईशान्य भारतातल्या तीन राज्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांत कोणत्या पक्षाचं सरकार बनणार ?, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे.
आगरताळा/कोहिमा/शिलाँग- ईशान्य भारतातल्या तीन राज्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांत कोणत्या पक्षाचं सरकार बनणार ?, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत तिन्ही राज्यांमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्रिपुरामध्ये सत्ताधारी सीपीएम आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं सर्व शक्ती पणाला लावली आहे. एक्झिट पोलनुसार, तिन्ही राज्यांत भाजपा घवघवीत यश मिळवून एक मोठा पक्ष म्हणून समोर येईल. दोन एक्झिट पोलमध्ये कम्युनिस्टांकडे गेल्या 25 वर्षांपासून असलेली त्रिपुराची सत्ता भाजपा खेचून आणणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यातील निवडणूक निकालाचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्रिपुरात 18 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. या तिन्ही राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. परंतु काही कारणास्तव तिन्ही राज्यांत 59 जागांवरच मतदान झालं आहे. त्रिपुराच्या 59 विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी करण्यासाठी 20 ठिकाणी 59 मतमोजणी केंद्रे बनवण्यात आली आहेत. मतमोजणीदरम्यान व्हिडीओग्राफीसुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी तपस रय यांनी दिली आहे. तर मेघालयचे निवडणूक आयुक्त एफ. आर. खारकोंगोर यांनी सांगितलं की, मतदान कक्षाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय पॅरामिलिस्ट्री फोर्सला तैनात करण्यात आलं आहे.
त्रिपुरावर सर्वांच्याच नजरा
या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये त्रिपुराच्या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. इथं गेल्या 25 वर्षांपासून कम्युनिस्टांचं सरकार आहे. केरळ सोडल्यात कम्युनिस्टांचं सरकार फक्त त्रिपुरात आहे. यावेळी भाजपानं त्रिपुरा ताब्यात घेण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. एक्झिट पोलमधूनही भाजपाचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात 92 टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केलं होतं.
नागालँड ठरवणार पुढची दिशा
नागालँडमध्ये यावेळी निवडणुकीत अस्थिर वातावरण आहे. अनेक संघटनांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेसला सर्व 60 जागांवर उमेदवारही उभे करता आलेले नाहीत. भाजपाचा सहयोगी पक्ष एनपीपी दुरावला असून, भाजपानं इतर पक्षांसोबत युती केली आहे.
मेघालयमध्ये काँग्रेसचा किल्ला वाचणार ?
मेघालयमध्ये काँग्रेस बालेकिल्ला राखणार का, याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मेघालयमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास राज्यात पक्ष संपल्याचं चित्र उभं राहील. त्यामुळे भाजपाच्या काँग्रेसमुक्त भारताच्या दाव्याला आणखी मजबुती मिळणार आहे. काँग्रेसला या निवडणुकीत चांगलं यश मिळवावं लागणार आहे.