त्रिपुरा निवडणूक- भाजपाला मत दिल्याने सासरच्यांनी सुनेची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 03:18 PM2018-02-24T15:18:47+5:302018-02-24T15:18:47+5:30
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सीपीएमऐवजी भाजपाला मत दिल्याने सासरच्यांनी सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अगरतला- त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सीपीएमऐवजी भाजपाला मत दिल्याने सासरच्यांनी सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीपीएमऐवजी भाजपला मत का दिलं? असा जाब विचारत सासरच्या लोकांनी सूनेची हत्या केली. महिलेला तिच्या सासऱ्याने आणि दीराने विटा व काठ्यांनी मारहाण करत तिची हत्या केली, अशी महिती महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. पीडित महिला 32 वर्षीय होती.
18 फेब्रुवारी रोजी त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत एका आदिवासी महिलेने सासरच्या लोकांच्या विरोधात जाऊन भाजपाला मत दिलं. भाजपाला मत दिल्याची माहिती मिळताच पीडित महिलेचे सासरे, दीर व अन्य एकाने घरात घुसून महिलेला मारहाण केली. शेजारी लोकांनी महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण, मारहाण करून हे दोघेही तेथून फरार झाले.
मारहाण झाल्याची माहिती मिळताच पीडित महिलेच्या पतीने तीन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण या प्रकरणी कुणाला अटक करण्यात आली नाही.
त्रिपुरा विधानसभेच्या 59 जागांसाठी 18 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. यावेळी सीपीएमची सत्ता संपुष्टात आणण्याचा दावा भाजपाने केला आहे. तर माणिक सरकारच्या नेतृत्त्वात सीपीएमही आपलं सरकार विचविण्याचा दावा करत आहे. 3 मार्च रोजी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.