तृणमूलने जिंकल्या ९२७० जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:26 AM2018-05-18T00:26:55+5:302018-05-18T00:26:55+5:30
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची राज्यावरची पकड अजिबात ढिली झालेली नाही हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या गुरुवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची राज्यावरची पकड अजिबात ढिली झालेली नाही हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या गुरुवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. तृणमूल काँग्रेसने ग्राम पंचायतींच्या ९२७० जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकांत भाजपा हाच तृणमूल काँग्रेसचा प्रतिस्पर्धी ठरला आहे.
भाजपाने ग्राम पंचायतींच्या २०७९ जागा जिंकल्या असून तो २०० जागांवर आघाडीवर आहे. माकपची पिछेहाट झाली असून त्याला ५६२ जागा जिंकता आल्या व तो ११३ जागांवर आघाडीवर आहे. सर्वात वाईट अवस्था काँग्रेसची आहे. या पक्षाने ग्राम पंचायतींच्या ३१५ जागा जिंकल्या असून तो ६१ जागांवर आघाडीवर आहे. ग्रामपंचायतींच्या ४८६५० जागांपैकी १६८१४ जागांसाठी, पंचायत समित्यांच्या ९२१७ जागांपैकी ३०५९ जागांसाठी व जिल्हा परिषदांच्या ८२५ जागांपैकी
२०३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. (वृत्तसंस्था)
>पंचायत समित्यांतही तृणमूल आघाडीवर
या निवडणुकांत अपक्षांपैकी ७०८ उमेदवार निवडून आले, १२० जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकांतही तृणमूलच पुढे असून तिथे या पक्षाने ९५ जागा जिंकल्या असून ६५ जागांवर आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेच्या तृणमूलने १० जागा जिंकल्या असून २५ जागांवर आघाडी घेतली. दक्षिण २४ परगणा, पूर्व मिदनापूर येथे तृणमूलने अन्य पक्षांना मागे टाकले. मुर्शिदाबाद व माल्दा वगळता तृणमूल काँग्रेसला भाजपानेच टक्कर दिली. मुर्शिदाबादमध्ये तृणमूलने ग्रामपंचायतींच्या ४६६ जागा जिंकल्या असून, काँग्रेसने ८३ जागा, माकपने ४८ व भाजपाने २४ जागा जिंकल्या. पुरुलियात मात्र भाजपा तृणमूल काँग्रेसच्या काहीसा पुढे आहे.