त्रिपुराचा विजय एकटया मोदींचा नाही, RSS चा ही मोठा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 17:50 IST2018-03-03T17:47:51+5:302018-03-03T17:50:01+5:30
त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती.

त्रिपुराचा विजय एकटया मोदींचा नाही, RSS चा ही मोठा वाटा
नवी दिल्ली - त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडच्या दोन राज्यांमधील भाजपाची प्रगती अनेक अंगांनी महत्वपूर्ण आहे. त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती. यापूर्वी अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भर दिला होता. पण त्रिपुरामध्ये भाजपा पूर्णपणे नरेंद्र मोदींवर अवलंबून नव्हता. भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्रिपुरा जिंकण्यासाठी मैदानात उतरला होता.
मागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, मुख्य निवडणूक रणनितीकार हेमंत बिस्वा सरमा आणि सुनील देवधर हे तिघेही रणनिती आखण्यापासून ते नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी मेहनत घेत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले सुनील देवधर हे 500 पेक्षा जास्त दिवसांपासून त्रिपुरामध्ये तळ ठोकून होते. मोदी सरकारच्या योजना राज्यातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर होता. त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना ईशान्येकडच्या राज्यांना भेटी देऊन तिथे सुरु असलेल्या प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष घालण्याची सूचना केली होती. आरएसएसचे प्रांत प्रमुखही आपल्या संघटनात्मक कार्यावर विशेष लक्ष देत होते. निवडणूक काळात मोदी सरकारमधील एकूण 52 मंत्र्यांनी त्रिपुराचा दौरा केला. यापूर्वी कधीही इतके मंत्री राज्यात फिरकले नव्हते. पंतप्रधानांनी इतके बारीक लक्ष घातल्यामुळे राज्यातील जनतेत विश्वास निर्माण झाला आणि या विश्वासाचे रुपांतर विजयात झाले असे सुनील देवधर यांनी सांगितले.
सरसंघचालक मोहन भागवतही डिसेंबरमध्ये त्रिपुरात आले होते. बेरोजगारी, विकासाचा अभाव यांना मुद्दा बनवत भाजपाने त्रिपुरात आघाडी घेतली व डाव्यांना आपणच योग्य पर्याय असल्याचे पटवून दिले. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. फक्त 1.54 टक्के मते भाजपाला मिळाली होती. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सर्वच्या सर्व 50 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे अशा राज्यात विजय खेचून आणण्याचे देवधर यांच्यासमोर अत्यंत कठिण आव्हान होते. भाजपाने इथे छोटया पक्षांबरोबर हातमिळवणी केली. आदिवासी पट्टयात जनाधार असलेल्या आयपीएफटी पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्याचा भाजपाला मोठा फायदा झाला.