त्रिवेंद्र सिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री
By admin | Published: March 18, 2017 01:22 AM2017-03-18T01:22:27+5:302017-03-18T01:22:27+5:30
उत्तराखंडमध्ये मुख्यंमत्री म्हणून भाजपाने त्रिवेंद्र सिंग रावत यांचे नाव निश्चित केल्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपाचा विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी आमदारांची
लखनौ/नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये मुख्यंमत्री म्हणून भाजपाने त्रिवेंद्र सिंग रावत यांचे नाव निश्चित केल्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपाचा विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी आमदारांची बैठक शनिवार होत आहे. उत्तराखंडमध्ये रावत यांचा शपथविधी शनिवारी होत असून, उत्तर प्रदेशात नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी शपथविधी होईल.
तथापि, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.
उत्तराखंडमधील भाजपा आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून त्रिवेंद्र सिंग रावत यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले रावत हे राज्याचे आठवे मुख्यमंत्री असतील. बैठकीत प्रकाश पंत यांनी रावत यांचे नाव सुचविले आणि सत्पाल महाराज यांनी त्यास अनुमोदन दिले. पंत व सत्पाल महाराज हे दोघे मुख्यमंत्रीपदाचे
इच्छुक होते. डेहराडूनमधील परेड मैदानावर रावत यांचा शपथविधी होणार आहे.
केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा या पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र, त्यांनीही आपण कोणत्याही शर्यतीत नसल्याचे म्हटल्यामुळे ते नाहीतर मग कोण, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांचे नावही गुरुवारी दुपारपर्यंत आघाडीवर होते. पण नवा नेता निवडण्याची जबाबदारीच नंतर त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यामुळे आपण नेता कसे असणार, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांचा हा आजार राजकीय असल्याची चर्चा दिल्लीत सुरू होती. पण ते
खरोखरच आजारी असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होईल का, अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र उत्तर प्रदेशात यंदा उपमुख्यमंत्रीही असेल, असे कळते. मौर्य यांना शुक्रवारीआज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यांना नेतानिवडीबाबत विचारले असता पक्षाचे आमदार उद्या
आपला नेता निवडतील असे त्यांनी सांगितले.
अपरिचित चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता
मौर्य आणि सिन्हा यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हेदेखील मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांनीही आपण राज्यात जाणार असल्याचे सांगितले आहे. भाजपा पक्षश्रेष्ठी फारशा परिचित नसलेल्या लोकांची निवड करून लोकांना आश्चर्याचा धक्का देतात. हरियाणात याचा अनुभव आला आहे. उत्तर प्रदेशातही हाच कित्ता गिरवला जाऊ शकतो. केंद्रीय निरीक्षक पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी निवडलेल्या उमेदवाराचे नाव आमदारांना सांगतील आणि त्यानंतर,
आमदार एकमताने त्यावर शिक्कामोर्तब करतील, असे कळते.