आणखी एका महिलेच्या मृत्यूने आप अडचणीत
By admin | Published: May 7, 2015 01:04 AM2015-05-07T01:04:46+5:302015-05-07T01:04:46+5:30
२०१३ साली एका अपघातात मृत्युमुखी पडलेली आम आदमी पार्टीची (आप) महिला कार्यकर्ती संतोष कोलीच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची मागणी बुधवारी केली.
नवी दिल्ली : २०१३ साली एका अपघातात मृत्युमुखी पडलेली आम आदमी पार्टीची (आप) महिला कार्यकर्ती संतोष कोलीच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची मागणी बुधवारी केली. महिला आयोगाचाही दरवाजा तिने ठोठावला आहे.
संतोषच्या नावाचा उल्लेख आपच्या एका महिला कार्यकर्त्याने पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरुद्ध दिल्ली महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केल्याने तिची आई कलावती यांनी उपरोक्त मागणी केली आहे. न्यायासाठी संघर्ष केल्यास तुझीही गत संतोष कोलीसारखी होईल, अशी धमकी विश्वास यांच्याकडून आपल्याला देण्यात आली असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
विश्वास यांच्यासोबत कथित अनैतिक संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका महिला कार्यकर्त्याने कुमार विश्वास या आरोपाचे खंडन करीत नसल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली आहे. कलावती यांच्या सांगण्यानुसार संतोषच्या मृत्यूनंतर त्यांनी आपचे नेते आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती; परंतु त्यांनी कलावती यांना घराबाहेर काढले आणि त्यानंतर पक्षाचा एकही नेता त्यांना भेटला नाही. (प्रतिनिधी)