दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 03:38 PM2024-08-04T15:38:38+5:302024-08-04T15:42:13+5:30
चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
Accident on Delhi-Mumbai Expressway : राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर रविवारी(दि.4) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिली, यानंतर ट्रक चालकाने गाडी थांबवण्याऐवजी कारला 1KM फरफटत नेले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील विक्रमगड अलोटचे रहिवासी असलेले कुटुंब ऋषिकेशवरुन आपल्या गावी परतत होते. या दरम्यान, त्यांची भरधाव कार सवाई माधोपूर जिल्ह्यातील सुरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनास नदीच्या पुलावर दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुढे जाणाऱ्या ट्रकला दोराने धडकली.
ट्रक चालकाने कार एक किलोमीटरपर्यंत खेचली
अपघातानंतरही ट्रकचालकाने कार सुमारे एक किलोमीटरपर्यंत खेचली. यानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांचे मृतदेह अडकले होते. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अपघाताचे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला.
या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. चारही मृतांचे मृतदेह सवाई माधोपूर जिल्हा मुख्यालयाच्या सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. मृतांमध्ये राजन, मोनिका, रेखा आणि धापू प्रजापत यांचा समावेश आहे. याशिवाय जखमींमध्ये पायल प्रजापत, बुलबुल प्रजापत, ज्योती प्रजापत, कृष्णा प्रजापत आणि कार चालक शकील खानसह लहान मुलगी अनिता यांचा समावेश आहे. चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.