जम्मू-काश्मीरमध्ये ट्रक चालकाची हत्या, आठवड्यातील चौथी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 10:38 PM2019-10-28T22:38:55+5:302019-10-28T22:39:17+5:30
गेल्या आठवड्याभरात ट्रक चालकावरील हल्ल्याची ही घटना चौथी आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भीतीचे, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दहशतवाद्यांनी सोमवारी अनंतनागमध्ये आणखी एका ट्रक चालकाची हत्या केली आहे. नारायण दत्त असे या ट्रक चालकाचे नाव आहे.
गेल्या आठवड्याभरात ट्रक चालकावरील हल्ल्याची ही घटना चौथी आहे. याआधी शोपियॉंमध्ये तीन ट्रक चालकांची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 350 रद्द केल्यानंतर दहशतवादी या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, काश्मीर खोऱ्यातील जनतेमध्ये भय निर्माण करण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून करण्यात येत आहेत.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथील हॉटेल प्लाझाजवळ संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 20 नागरिक जखमी झाले आहेत. त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी सीआरपीएफचे जवान दाखल झाले असून या परिसराला घेराव घातला आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
#UPDATE Kashmir Zone Police: One civilian has been killed in the firing of the terrorists. Police is on the spot. Area has been cordoned and search continues. #JammuAndKashmirhttps://t.co/dptrjzMpvr
— ANI (@ANI) October 28, 2019
ट्रकचालकांच्या हत्या हा काश्मिरच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला
ट्रकचालाकांच्या हत्या हा जम्मू काश्मिरमधील जनतेच्या अर्थव्यवस्थेवर आणि त्यांच्या जीवनमानावर हल्ला करण्याच प्रयत्न आहे, असे पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनी शनिवारी सांगितले. पत्रकारांना ते म्हणाले, अशा गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे. या बाबत पोलिसांना महत्वाचे दुवे मिळाले आहेत. त्याचा तपास अंतिम टप्प्यात आहे. ट्रकचालकांवरील हल्ले आणि शोपीअन जिल्ह्यातील वीज केंद्रावरील हल्ला हे हार्टीकल्चर आणि पर्यटन या अनेक काश्मिरींच्या रोजीरोटीच्या व्यवसायावरील हल्ला होता, असे ते म्हणाले.